महाराष्ट्र न्यूज़ फलटण शहर प्रतिनिधी: प्रतापसिंह भोसले:
फलटण शहर व परिसरातील अनेक नागरिकांचे मृत्यू झाले नंतर फलटण शहरातील ज्या नागरिकांवर अग्निदहण करुन अंत्यसंस्कार करावयाचे असतात त्यांचे साठी फलटण नगरपरिषदे मार्फत केवळ एकाच स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात आलेली आहे व तिथे सुध्दा फक्त पाच मृतदेहांवरच एकावेळी अंत्यसंस्कार करण्याची सोय उपलब्ध आहे.
फलटण शहर व परिसरातील नागरिकांची वाढलेली लोकसंख्या विचारात घेता अग्निसंस्कार करता येऊ शकणाऱ्या एकाच स्मशानभूमी ऐवजी जास्त स्मशानभूमीची उपलब्धता असणे अत्यंत आवश्यक आहे. या करिता फलटण नगरपरिषदेच्या मालकीच्या व काही समाजांच्या पारंपारिक अनेक जागा अशा आहेत जिथे नवीन स्मशानभूमीची उभारणी करण्यात येऊ शकते. यापैकी काही जागांकडे त्यांनी लक्ष्य वेधले..
शिंगणापूर रस्त्यावर ओढ्या लगतचे जुने महीला वसतीगृह व त्याच्या पिछाडीची सुमारे तीन एकर जागा ही फलटण नगरपरिषदेच्या मालकीची आहे. यामधील मोकळ्या जागेत जास्तीत जास्त १ एकरामध्ये स्मशानभूमीची उभारणी करता येऊ शकते.
याच ओढ्याच्या कडेला विद्यानगर लगत अशीच तीन ते चार एकर जमीन फलटण नगरपरिषदे करीता आरक्षित करण्यात आली आहे. सदरच्या जागेत सुध्दा स्मशानभूमीची उभारणी करता येऊ शकते.

शुक्रवार पेठेतील वेलणकर दत्तमंदिर चे पिछाडीस बाणगंगा नदी लगत जे मुस्लीम कब्रस्तानालगत दहावा शेड आहे त्याचे परिसरात स्मशानभूमीची उभारणी करता येऊ शकते.
फलटण – सातारा रस्त्यावरील बाणगंगा नदी वरील पुलाचे लगत उत्तर व दक्षिण बाजूस स्मशानभूमीची उभारणी करता येऊ शकते.
याच रस्त्यावर पुल ओलांडल्यावर त्याचे लगत वडार समाजातील लोकांची स्मशानभूमी साठीची पारंपारिक एक एकर पेक्षा जास्त जागा असून, या समाजातील काही लोकांसोबत त्यांनी या विषयी चर्चा केली असून त्यांनी स्मशानभूमीची नव्याने पुनर्रउभारणी करण्याची तयारी दर्शवली असून ते सुद्धा ही जागा सदरच्या प्रस्तावासाठी फलटण नगरपरिषदेस उपलब्ध करून देतील.
वरील सर्व जागांवर किंवा यापैकी किमान दोन ठिकाणी फलटण नगरपरिषदे मार्फत स्मशानभूमीची तत्काळ उभारणी करण्यात यावी. तसेच ही उभारणी करताना किमान एका ठिकाणी विद्युत, सोलर, गॅसवरील किंवा डिझेल वर चालणारी अग्नीदाहिणी उभारण्यात यावी. म्हणजे पुढील काळात पर्यावरणाचा ऱ्हास टाळता येऊ शकतो व सध्याच्या कोरोना महामारी सारख्या किंवा इतर गंभीर आजाराने मृत्यू पावलेल्या व्यक्तींवर योग्य प्रकारे शास्त्रीयदृष्ट्या अंत्यसंस्कार करता येऊ शकतील, असे सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) नगरसेवक,फलटण नगरपरिषद यांनी मुख्याधिकारी, फलटण नगरपरिषदेस कळविले आहे. संबंधीचा प्रस्ताव फलटण नगरपरिषदे मार्फत महाराष्ट्र शासनाकडे योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठविण्यात यावा अशी विनंतीही त्यांनी केली आहे.






















