कराड : कराड तालुक्यातील येणके येथे पाच वर्षीय ऊसतोड मजुरांच्या मुलावर बिबट्याने जीवघेणा हल्ला करून ठार केले. सकाळी 7 वाजता ही घटना येणके- किरपे रस्त्यावरील शिवारात ही घटना घडली आहे. आकाश बिगाशा पावरा असे मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येणके गावच्या हद्दीतील इनाम शिवारात ऊसतोड सुरू होती. सकाळी सात वाजता पाच वर्षीय मुलगा रानात खेळत असताना पाठीमागून बिबट्याने मुलांवर हल्ला केला, त्यानंतर ऊसाच्या शिवारात जवळपास अर्धाकिलोमीटर अंतरावर मुलाला बिबट्याने उचलून नेले. या प्रकारामुळे ऊसतोड मजुरांनी बिबट्याचा पाठलाग केला. मात्र मुलाला वाचविण्यात यश आले नाही.
कराड तालुक्यातील किरपे, येणकेसह तांबवे – सुपने भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढलेला असून गेल्या काही दिवसापूर्वी दक्षिण तांबवे येथेही बिबट्याने एका मुलावर हल्ला केला होता. तर गेल्या आठवड्यात चचेगाव येथील महिलेवरही बिबट्याने हल्ला केला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने दखल घेवून बिबट्याचा बंदोबस्त करवे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.