महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :बारामती
सिप्ला कंपनीने रेमडिसीवर या इंजेक्शनची किंमत कमी करत कोरोना रुग्णांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे. कोरोना रुग्णांना उपचारादरम्यान दिल्या जाणाऱ्या रेमडिसीवर इंजेक्शनची किंमत कमी केली असून अवघ्या २,२०० रुपयात ते रुग्णांना उपलब्ध होणार आहे. या इंजेक्शनची किंमत बाजारात ५,४०० वरून २,२०० रुपयांपर्यंत कमी केल्याचे पत्र वैद्यकीय शिक्षण खात्याने जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व सरकारी, खासगी रुग्णालयांना पाठविले आहे. पुणेकरांसाठी रेमडिसीवर पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिले जाणार असून त्याचा साठा कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन वाद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहे. पुण्यात अमित देशमुख यांची वाद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्याशी या प्रश्नाबाबत चर्चा झाली.
पुण्यात इंजेक्शनचा तुटवडा असल्याने डॉ. लहाने यांनी चार उत्पादक कम्पन्यांशी संपर्क साधला त्यावेळी कम्पन्यांकडे १ लाख इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयांनी आवश्यकतेनुसार ७२ तासांपुर्वी ऑर्डर नोंदविल्यास इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन उत्पादकांनी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना दिले आहे. अशी माहिती माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे दिली.
वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. लहाने यांनी या बठकीत सिप्ला कंपनीने १०० मिलिग्रॅम रेमडिसीवरच्या इंजेक्शनची किंमत ५,४०० वरून सुमारे २,२०० रुपयांपर्यंत कमी केल्याचे पत्र जारी केल्याची माहिती दिली. हे पत्र सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह सरकारी, खासगी रुग्णालयांना पाठविण्यात आले आहे. असेही मोहन जोशी यांनी सांगितले.