निरा : दि. १४ रोजी सकाळी पहाटे पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक फौजदार सुदर्शन होळकर यांना गोपनीय माहिती मिळाली की,आयशर कंपनीचा एम एच १३ सी यू ४३४५ संशयित टेम्पो गुटखा घेवून मोरगाव रोड कडे चालला आहे. हे कळताच ही माहिती होळकर यांनी पोसई नंदकुमार सोनवलकर यांना कळविले आणि पोलीस स्टाफ हा मोरगाव रोडने टेम्पो चा पाठलाग करून गुळूंचे गाव हद्दीतील रूपाडीचा माळ येथे टेम्पोला थांबवून चौकशी केली असता ड्रायव्हर दावलमलिक हुसैनसाब चौधरी ( वय २१) रा. जकळवेट्टी, जिल्हा बेळगांव, आणि आरिफ हुसैन रोहिले ( वय ३७) रा. मिरज, जिल्हा सांगली यांच्या कडून उडवा उडविची उत्तरे मिळाल्याने टेम्पो निरा पोलीस दूरक्षेत्रात आणून पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला २१लाख ४५ हजार रुपयांचा हिरा पान मसाला व ११ लाख ५५ हजारचे सुगंधी तंबाखू आढळून आले. या एकूण ३३ लाख रुपयांच्या मालासह १० लाख किमतीचा टेम्पो असे मिळून ४३ लाख किमतीची जप्ती करण्यात आली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई नंदकुमार सोनवलकर, सहा.फौजदार सुदर्शन होळकर, पो.ह. संदीप मोकाशी, राजेंद्र भापकर, पोलीस नाईक गावडकर, हरिश्चंद्र करे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश जाधव, होमगार्ड सागर साळुंखे, बापू बरकडे, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, पोलीस मित्र रामचंद्र कर्णवर यांनी केली. जेजुरी येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास पोसई नंदकुमार सोनवलकर करीत आहेत.