सातारा दि.25 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून विविध उपचार व तपासण्याचे दरपत्रक निश्चित करण्यात आले आहेत. परंतू या तपासण्यांव्यतिरिक्त रुग्णांसाठी सीटीस्कॅनसारख्या तपासण्यांची आवश्यकता भासत आहे. या तपासण्यासाठी खाजगी रुग्णालये किंवा सीटीस्कॅन सुविधा उपलब्ध असलेल्या केंद्राकडून अवाजवी रक्कम आकारण्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने शासनाने एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चीत करण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्गमित झाला आहे. सर्वसाधारणपणे 16 ते 64 स्लाईस या क्षमतेच्या मशिन्सद्वारे तपासणीसाठी पुढीलप्रमाणे कमाल दर निश्चीत करण्यात आले आहेत.
16 स्लाईसपेक्षा कमी स्लाईससाठी 2 हजार रुपये एवढा निश्चीत करण्यात आला असून 16ते 64 स्लाईस क्षमतेच्या तपासणीसाठी 2500 रुपये दर असेल. आणि 64 स्लाईसच्या पुढील क्षमतेच्या तपासणीसाठी कमाल 3000 इतका दर निश्चीत करण्यात आला आहे. या तपासण्यांच्या दरामध्ये सीटीस्कॅन तपासणी, तपासणी अहवाल सी.टी.फिल्म, पी. पी. ई. किट, डिसइन्फेक्टंट, सॅनिटायझेशन चार्जेस व जीएसटी या सर्वांचा समावेश असेल. निश्चीत करण्यात आलेले दर हे नियमित व तातडीच्या तपासणीसाठी लागू राहतील. तपासणी केलेल्या अहवालावर किती स्लाईसच्या मशिनवर तपासणी केली हे नमुद करणे, तसेच संपुर्ण अहवाल देणे बंधनकारक असेल.
सर्व रुग्णालये अथवा तपासणी केंद्रांनी या तपासणीचे दर दर्शनी भागावर लावणे बंधनकारक राहील. सदरचे दर हे कोविड तसेच नॉनकोविड रुग्णांसाठी लागू असतील, असे शासन निर्णयात नमुद आहे. एचआरसीटी तपासणीसाठी निश्चीत केलेल्या दरापेक्षा जास्त दराने आकारणी केल्यास संबंधितावर कारवाई करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका क्षेत्राबाबत महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.