महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (फलटण) : प्रतापसिंह भोसले
आजही शासनाच्या विविध योजनांचा लाभ भटक्या व विमुक्तापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहचला नाही. त्यांचे वाडी वस्ती व पाला – तांड्यांपर्यंत पोहचवण्यासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागाचा सातत्याने प्रयत्न असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी साथ देवून सक्रिय होणे गरजेचे आहे, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त तथा जिल्हा दक्षता समितीचे सचिव नितीन उबाळे यांनी केले.
भटक्या व विमुक्त जाती – जमाती परिवार कार्यकर्ते, पाईसा कलामंच व राष्ट्रोत्सव संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उबाळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी आयोजित केलेल्या शिष्टमंडळास ते मार्गदर्शन करीत होते.

यावेळी भटक्या व विमुक्त कार्यकर्त्यांच्या वतीने परिवार ग्रुपचे रविंद्र औताडे यांनी सातारी कंदी पेढे देवून स्वागत केले. यावेळी सर्व जेष्ठ सदस्यांची ओळख दिलिप काकडे यांनी करून दिली.
यावेळी सदस्य रविंद्र औताडे, विलासराव काकडे, मुकुंदराव अटक, राजाराम इंगवले, गोविंदराव अटक, गोंधळी समाज व अन्य कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. रविंद्र औताडे यांनी सुत्रसंचालन केले व शंकरराव उबाळे यांनी आभार मानले.




















