महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी पाटण:
पाटण तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून शनिवारी सायंकाळी विजांच्या गडगडाटांसह जोरदार पाऊस झाला. यावेळी वनकुसवडे डोंगर पठारावरील घाणबी, ता. पाटण येथील भीमाबाई गणपत जाधव याच्या घरावर सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास विजेचा लोळ पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. यात सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आल्याची माहिती गावकामगार तलाठी एस. जे. जागंडे यांनी दिली.याबाबत अधिक माहिती अशी, पाटण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शनिवार दि. 10 रोजी सायंकाळी ढगांच्या गडगडाटांसह विजांच्या लखलखाटात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरूवात झाली.
यावेळी घाणबीमधील भिमाबाई गणपत जाधव यांच्या घरावर विजेचा लोळ पडल्याने घराला आग लागली व घरांच्या भितीही पडल्याआगीने घरातील लाकडी साहित्यासह पत्रा, घरातील संसारोपयोगी साहित्य, भांडी-कुंडी जळाली. त्याचबरोबर घरातील भात, ज्वारी, गहू यांसह अन्नधान्यांचा साठाही आगीत जळून खाक झाला आहे. यात घराचे मोठे नुकसान झाल्याने भिमाबाई गणपत जाधव यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठी झाली आहे.घाणबी गावचे उपसरपंच चंद्रकांत सपकाळ, माजी उपसरपंच तुकाराम चव्हाण, जगन्नाथ जाधव, नारायण सपकाळ, नारायण जाधव यांनी घटनास्थळी जावून भिमाबाई यांच्यासह घरातील भेदरलेल्या कुटुंबाला तातडीने मदत केली.
दऱ्यान या घटनेची माहिती मिळताच गावकामगार तलाठी एस. जे. जागंडे, ग्रामसेवक के. एम. खरात यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून घडलेल्या घटनेचा पंचनामा केला आहे. यात भिमाबाई जाधव यांचे 2 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान आचानक घडलेल्या घटनेमुळे भिमाबाई जाधव यांना मानसिक धक्का बसला आहे.






























