महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आज मंगळवारी ( दि.२० ) झालेल्या निवडणुकीत काटी गणातील सदस्या स्वातीताई बापूराव शेंडे (रा.वरकुटे खुर्द) बहुमताने निवडून आल्या . त्यामुळे पंचायत समितीवर भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे वर्चस्व कायम राहिले आहे .
पं.स.च्या विद्यमान सभापती पुष्पा रेडके यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली . यावेळी सत्तारूढ बाजूकडून सभापती पदासाठी स्वाती शेंडे यांनी तर विरोधी राष्ट्रवादीकडून शेटफळगढे गणाच्या सदस्या शीतल वनवे यांनी उमेदवारी अर्ज केला . यावेळी झालेल्या मतदानात स्वातीताई शेंडे यांना ८ मते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल वनवे यांना ५ मते मिळाल्याने सभापतीपदी स्वातीताई शेंडे यांची बहुमताने निवड झाल्याचे घोषित करण्यात आले .
यावेळी भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त सभापती स्वाती शेंडे यांचा सत्कार करण्यात आला . तसेच माजी सभापती पुष्पा रेडके यांचा उत्कृष्ट कामकाजाबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी सत्कार केला व त्यांचा कामाचे कौतुक केले .
हर्षवर्धन पाटील म्हणाले ,’ माजी सभापती पुष्पा रेडके यांनी चांगले काम केले , कोरोना काळात आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली . नवनियुक्त सभापती स्वाती शेंडे यांनी सामान्य माणसाच्या हिताचे काम करावे .
नूतन सभापती स्वाती शेंडे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील लोकांना पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तत्पर राहू , असे सांगितले.याप्रसंगी माजी सभापती करणसिह घोलप व सदस्य हेमंत नरूटे यांनी मनोगत व्यक्त केले निवडणूक अधिकारी म्हणून बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे , गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी काम पाहिले .
यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार , उदयसिह पाटील , मयुरसिह पाटील , लालासाहेब पवार , विलासराव वाघमोडे , उपसभापती संजय देहाडे , मंगेश पाटील , मोहन दुधाळ , देवराज जाधव , महेंद्र रेडके , कैलास कदम , पंचायत समितीचे सर्व सदस्य , आदी मान्यवर उपस्थित होते .