राष्ट्रवादी पुरस्कृत असणारे आणि विद्यमान नगराध्यक्ष सागर पोळ यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत त्याप्रकरणी सहकारी नगरसेवकांसह उपोषणाचा फुसका बार काढणाऱ्या दहिवडीच्या उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांनी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यास ढकलून देत शिवीगाळ केल्याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस ठाण्यात नोंद असलेली सविस्तर हकीकत अशी की, बुधवार दि.२०/१२/२०२३ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संदीप मोहन आवटे(रा.दहिवडी) हे दहिवडी नगरपंचायती शेजारी पाणीपुरवठा, लाईटविभाग, घंटागाडी इत्यादी विभागाचे सार्वजनिक कार्य पार पाडत होते. त्यावेळी आवटे यांना ते काम करू न देता उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांनी अटकाव केला. त्याचबरोबर तुपेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या आतमध्ये नगरपालिकेची लाईटची लाईन नसताना तो तेथे बल्ब का बसवला नाही? या कारणावरून राजेंद्र साळुंखे यांनी संदीप आवटे यांना ढकलून देऊन शिवीगाळ केली. याप्रकरणी त्यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून राजेंद्र साळुंखे यांच्यावर धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस फौजदार श्री.खाडे करत आहेत.