महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / सातारा:
फलटण शहरातील डेक्कन चौकाचे सुशोभीकरण करण्याचा ठराव बेकायदेशीररित्या करण्यात आला असल्याचा पर्दाफाश विरोधी पक्षनेते समशेरसिंह ना.निंबाळकर यांनी केला. दरम्यान, चौकाचे बेकायदेशीर बांधकाम आणि ठरावाची चौकशी करण्याची मागणी लावून धरण्यात आल्यानंतर पालिका मुख्याधिकारी यांनी बांधकाम विभागाला सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
ऐन कोरोना कालावधीत फलटण शहरातील जनजीवन ठप्प असताना डेक्कन चौकाचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले. या कामासाठी चक्क रुग्णालयाकडे जाणारे रस्ते देखील बंद करण्यात आले होते. दरम्यान, ह्या घटनेबाबत शहरात पडसाद उमटू लागल्याने विरोधी गटाने पालिका मुख्याधिकारी यांना धारेवर धरले. कोणत्या ठरावानुसार डेक्कन चौकाचे काम करण्यात येत आहे ? याची ताबडतोब माहिती देण्याची मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
त्यावर मुख्याधिकारी यांनी ठरावाची प्रत विरोधी पक्षनेत्यांना दिली. त्यामध्ये धक्कादायक बाब समोर आली. सन २०१५ मध्ये झालेल्या पालिका सभेत प्रभाग क्रमांक ४ ( मलठण) परिसरातील चौक व रस्त्यांना नावे देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता.
मात्र, दरम्यानच्या कालावधीत ठरावाच्या यादीत अखेरच्या स्थानावर डेक्कन चौक नामकरण व सुशोभीकरण करण्याचा विषय बेकायदेशीररित्या समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे ह्या कामाची आणि बेकायदेशीर ठरावाची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते समशेरसिंह ना.निंबाळकर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे लावून धरली. आता लवकरात लवकर चौकशी होवून बेकायदेशीररित्या ठरावात विषय समाविष्ट केलेल्या अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
समशेरसिंह ना.निंबाळकर यांनी केली आहे.




















