मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे प्राधान्यक्रम निश्चित झाले असून एकाच वेळी राज्याच्या ३६ जिल्ह्यांमध्ये लस देण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आरोग्यमंत्री टोपे यांनी रक्तदान केल्यानंतर टोपे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, पहिल्यांदा आरोग्य सेवकांना, नंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर ५० वर्षांवरील कोमोर्बिड लोकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. हे लसीकरण पूर्ण झाल्यावर सर्व ५० वर्षांवरील लोकांना लस देण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात ११ कोटींपैकी ३ कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. यादी तयार करून मतदान केंद्राप्रमाणे लस दिली जाईल. लस दिल्यानंतर ३० मिनिटे तिथे बसवले जाईल. केंद्राकडून आलेली लस नवी मुंबईतील वाशी केंद्रात ठेवली जाणार असून तेथून वितरण केले जाणार आहे. लसीकरणासाठी १६ हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आल्याचेही टोपे यांनी सांगितले. लसीकरणासाठी विविध स्तरांवर समन्वय यंत्रणा करण्यात आली आहे. राज्यस्तरीय सुकाणू समितीनंतर राज्य कृती दल, राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हास्तरावर जिल्हा कृती दल, जिल्हा नियंत्रण कक्ष, तालुकास्तरावर तालुका कृती दल आणि तालुका नियंत्रण कक्ष अशी यंत्रणा आहे.
शासकीय आरोग्य संस्थेतील ९९ टक्के तर खासगी आरोग्य संस्थेतील कर्मचाऱ्यांचा ७८ टक्के डेटा आतापर्यंत तयार झाला आहे. १६ हजार २४५ कर्मचाऱ्यांची लस टोचण्यासाठी को-विन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. आतापर्यंत को-विन पोर्टलवर ९० हजारांहून अधिक लाभार्थींची नोंदणी झाल्याची माहिती टोपे यांनी दिली. लसीकरण पथकामध्ये पाच सदस्यांचा समावेश असेल. त्याचबरोबर महाराष्ट्रातील ३४४ रक्तपेढ्यांमध्ये लसीकरणानंतर त्या व्यक्तीच्या मोबाईलवर संदेश येईल आणि क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्रदेखील पाठविण्यात येईल, असे राजेश टोपे यावेळी म्हणाले.