पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे सोमवारी पहाटे कोल्हापूरमध्ये निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.
श्रीपती खंचनाळे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांना शहरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते.त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयाच्या परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. ते मूळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा येथील होते.
श्रीपती खंचनाळे यांनी 1959 ला पंजाब केसरी बनता सिंग यांना पराभूत करून ‘हिंदकेसरी’ ची गदा मिळवली होती. ते पहिले ‘हिंदकेसरी’ ठरले होते. या विजयाने त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उंचावले होते. त्याच वर्षी त्यांनी कराड येथे आनंद शिरगावकर यांना दोन मिनिटात अस्मान दाखवत ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावला होता. त्यांनी 1958, 1962, 1965 या साली झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियन स्पर्धाही जिंकल्या.
श्रीपती कंचनाळे यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांची कुस्तीतील जडण-घडण कोल्हापुरातील शाहूपुरी तालमीत झाली. त्यांनी अनेक कुस्तीपटू घडवले आहे. त्यांचे पार्थिव शाहूपुरी तालमीत अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. तिथून ते त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येईल.