महाराष्ट्र न्यूज मायणी प्रतिनिधी : मंगेश भिसे
ब्रिटिश कालीन मायणी तलाव लाभक्षेत्रातील मायणी,चितळी,माहुली गावांच्या शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरून द्यावेत ही मागणी पाटबंधारे विभागामार्गत केल्या काही दिवसापूर्वी करण्यात आली होती. त्यानुसार संबंधित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीवरून आज मायणी ब्रिटिशकालीन तलावाच्या कालव्याला तब्बल दहा वर्षानंतर पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
गेली अनेक वर्षे दुष्काळी परिस्थितीमुळे मायणी ब्रिटिशकालीन तलाव येथे पाण्याची उपलब्धता नसल्याने तलावाच्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील मायणी,चितळी,माहुली या गावातील शेतकरीवर्ग पाण्यावाचून वंचित होता.गत दोन वर्षांपासून मायणी तलावात पावसामुळे मुबलक पाणीसाठा आहे . तलाव ओसंडून वाहिल्याने चांद नदीला अनेक वर्षातून पुराची स्थिती पहावयास मिळाली होती.सध्याही तलावातून लाखो लिटर पाणी विनावापर नदीपात्रात वाहून जात आहे . वाहून जाणारे पाणी कालव्याच्या माध्यमातून पिकांना देने गरजेचे असल्याने सध्या रब्बीच्या पिकांसाठी तलावातील पाणी सोडावे , अशी मागणी शेतकरी वर्गातून होत होती.मायणीतील २२ व चितळीतील ४६ शेतकऱ्यांनी पाणी मागणीसाठी अर्ज केले आहेत. माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनीही शेतकऱ्यांच्या हितावह उपलब्ध मुबलक पाणी यंदा कालव्याला सोडण्यात यावे या मागणीसाठी पाठपुरावा केला होता. शेतकऱ्यांच्या शेतीपाण्याच्या मागणीचा विचार करून पाटबंधारे विभाग यांचेकडून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती उपअभियंता सुभाष खाडे यांनी दिली .
त्यानुसार , माहिती पाटबंधारे विभागाचे कर्मचारी दत्तात्रेय सावंत व मधुकर शिंदे यांचेमार्फत तलावातून चांदनदीत वाहून जाणारे पाणी फळ्यांच्या मार्फत बंधाऱ्यात अडवण्यात येऊन आज सकाळी कालव्याचे दरवाजे उघडण्यात आले.
गत दहा वर्षांपासून या कालव्यात पाणी वाहिले नसल्याने कालव्याची ठिकठिकाणी नादुरुस्ती झाली होती हे दुरुस्तीचे काम करण्यात येऊन पाटात वाढलेली छोटी झुडपे, वाळजे वस्तीनजीक फुटलेला कालवा,काळवाट रस्त्यावरील पूल यांची दुरुस्ती आजअखेर करण्यात आली आहे.सध्या चितळी येथील पोट पाटाचे काम चालू करण्यात आले आहे.
तलाव लाभ क्षेत्रातील लाभधारक सर्व शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरून देऊन विभागास सहकार्य करावे , असे आवाहन कृष्णा सिंचन पाटबंधारे विभाग उपअभियंता सुभाष खाडे यांनी केले आहे.
दुरुस्त केलेल्या कालव्याची गळती तपासणीसाठी गेल्या दोन महिन्यापूर्वीच पाणी सोडणे आवश्यक होते.
२००९-१० साली कालव्याला पाणी आले होते . १० वर्षातून कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने निश्चित शेतकऱ्यांच्या हरभरा,गहू,ज्वारी,ऊस या पिकांना याचा लाभ होणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पूर्ण क्षमतेने या कालव्यात पाटबंधारे विभागाने पाणी सोडणे आवश्यक असून मायणी क्षेत्रातील पोटपाटांचीही दुरुस्ती आवश्यक आहे. -रणजित माने,ग्रामपंचायत सदस्य ,मायणी