महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / कराड :
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. मराठी पत्रकारितेचा पाय उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशात्री जांभेकरांची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस ‘ पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलतर्फे सर्व पत्रकारमित्रांना शुभेच्छा देण्यात आल्या.
कोरोनाने जभरासह भारतामध्ये थैमान घातले तेंव्हा डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस आणि पत्रकार हे सातत्याने कोरोनाशी दोन हात करत होते. यावेळी लोकशाहीचा आधारस्तंभ असलेली पत्रकारिता रणांगणात उतरली होती.एकीकडे कोरोनाशी युद्ध पेटलं असताना समाजापर्यंत विश्वासार्ह, अधिकृत बातमी पोहचविण्याचे काम पत्रकारांनी सचोटीने केले. कोट्यवधी जनता भीतीच्या सावटाखाली असताना तत्कालीन घडामोडी सांगून वाचकांना दिलासा देत, अनेक आरोग्यविषयक सदरे देऊन जनतेचे मनोधैर्य वाढविले.सरकारने लॉकडाऊन सारखी कठोर पावली उचलली होती. अशा परिस्थितीत सारेच बंद असताना पत्रकार रस्त्यावर उतरून नियमांचे पालन करत, प्रसंगी उपाशी राहून आणि आपला जीव धोक्यात घालून आपले काम प्रामाणिकपणे करत होते.
काळाबरोबर पत्रकारितेच्या स्वरूपात बदल घडला मात्र सर्वसमावेशकता व तळागाळातील जनतेचे प्रश्न मांडणे हा पत्रकारितेचा गाभा आज देखील कायम आहे.
शाळेचे प्राचार्य श्री अन्वय चिकाटे आणि उपप्राचार्य श्री. गणेश काकडे यांनी या कोरोना योद्धांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री विकास भोसले, कार्यकारी संपादक, महाराष्ट्र न्यूज, श्री. कैलास थोरवडे कराड तालुका प्रतिनिधी, महाराष्ट्र न्यूज श्री. दिनेकश कांबळे, कराड पाटण ऑफीसहेड, महाराष्ट्र न्यूज उपस्थित होते.