सीता हादगे यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा
सातारा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील सातारा शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे येत्या ४८ तासांच्या आत तात्काळ बुजविण्यात यावेत, ते न बुजवल्यास त्या खड्डयांमध्ये वृक्षरोपण करण्यात येईल. ४८ तासानंतर त्याच खड्डयांमध्ये वाहन आढळून एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे, असा इशारा सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा सभापती सीता राम हादगे यांनी एका निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे दिला.
निवेदनात म्हटले आहे की, काही महिन्यांपूर्वी सातारा शहरामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्त्यांची खड्डयामुळे अक्षरशः चाळण झाली आहे. प्रभाग क्रमांक १ मधील कराड- महाबळेश्वर मार्गावर आणि सातारा – कोरेगाव मार्गावर तहसीलदार कार्यालयाच्या शेजारी म्हणजेच ज्या ठिकाणी ग्रेड सेपरेटर संपतो त्या परिसरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असणार्या सेवा रस्त्यावर ठिकठिकाणी सहा ते आठ इंच खड्डे पडले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी हे खड्डे लक्षात येत नसल्यामुळे दुचाकी वाहनचालकांचा या खड्डयात दुचाकी आदळून कपाळमोक्ष होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. दोनच दिवसापूर्वी दिवसा ढवळ्या दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलेची दुचाकी या खड्डयात आदळून दुचाकीवरील महिला व तिच्या सोबत असणारा मुलगा रस्त्यावर पडून जखमी झाले. याच वेळी पाठीमागून वेगाने वडाप जीप येत होती. सुदैवाने जीप चालकाने जीपवर नियंत्रण मिळवल्यामुळे फार मोठा अनर्थ टळला.
थोडक्यात प्रभाग क्रमांक १ मधील तहसीलदार कार्यालय परिसरातील दुतर्फा असणार्या सेवा रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसापासून खड्डे पडूनही ते बुझविण्याकडे आपल्या विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. ही अत्यंत दुर्दैवी आणि निराशजनक बाब आहे. काही वर्षापूर्वी तहसीलदार कार्यालय परिसरात असणाऱ्या मंडईतून मंडई खरेदी करून एक दुचाकीचालक घरी परतत असताना पोवई नाका परिसरात असणाऱ्या जुन्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीसमोर असणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या खड्डयात दुचाकी आदळली. दरम्यान पाठीमागून वेगाने येणाऱ्या वाहनाने त्या दुचाकी चालकाला जागीच चिरडल्याची घटना घडली होती. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची वाट पाहत असाल तर जनता तुम्हाला नक्कीच माफ करणार नाही.
खड्डयात वृक्षरोपण करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यासाठी पुढाकार घेणार !
प्रत्येक वाहनचालक प्रामाणिकपणे रस्त्यांचा कर भरत असतो. अशावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहन चालकांना उच्च दर्जाचे रस्ते उपलब्ध करून देण्याची गरजच नव्हे, तर ती त्यांची बांधिलकी आहे. एखादे वाहन चालकाने टॅक्स भरला नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित विभागाकडून त्याच्यावर धडक कारवाई केली जाते. ही कारवाई करण्यात जेवढी तत्परता दाखवली जाते, तेवढीच तत्परता सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्या बाबत का दाखवत नाही? मोठा प्रश्न वाहनचालकांचा सर्वसामान्य जनतेला पडत आहे. येत्या ४८ तासात प्रभाग क्रमांक १ मधील आपल्या हद्दीतील रस्त्यांवर पडलेले खड्डे न बुजविल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध म्हणून त्याच खड्डयामध्ये वाहनचालकांना समवेत घेऊन वृक्षारोपण केले जाईल. ४८ तासानंतर त्याच खड्डयांमध्ये वाहन आढळून एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे. कृपा करून ही वेळ येऊन न देता खड्डे तात्काळ बुजवावेत, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.