८ मार्च जागतिक महिला दिन.आज स्त्रीयांना सगळे शुभेच्छा देतील. हा दिवस कधी सुरू झाला इथपासून तर तो कसा साजरा करावा इथपर्यंत सगळ्या तपशीलात जातील.जायला पण काहीही हरकत नसावी. प्रत्येक यशस्वी पुरूषांच्या मागे स्त्री चा कसा हात आहे हे आवर्जून सांगतील. स्त्री किति पुढे गेली आहे, ती काय काय करते या बाबत चर्चा होतील. या व्हायलाच पाहिजेत.पण मला वाटतं या सगळ्या गोष्टींच्या बरोबरीने अजूनही काही महत्त्वाचे प्रश्न असावेत.या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करावा.स्त्री आणि पुरूष या पृथ्वीवरच्या दोनच जाती आहेत.दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. असे असताना आज स्त्री चे स्थान पुरूषांच्या बरोबरीचे आहे का? तिला समतेने वागवलं जातं का? दररोज सकाळी वर्तमानपत्र उघडलं की स्त्री अत्याचाराच्या बातम्या असणारच हे आजचं सार्वजनिक सत्य आहे.तिला आजही व्यक्ती न समजता वस्तू समजले जाते.तिची मानसिक जडणघडण अशी केली जाते की तिच्या व्यक्तीमत्वाचा सगळ्यांची तिने फक्त सेवा करावी हा अविभाज्य भाग आहे.दिवसभर काम करून जेंव्हा स्त्री घरी जाते तेंव्हा तिन तिला आलेला दिवसभराच्या कामाचा थकवा विसरून पुन्हा घरातलं काम करायचं असतं.घरात कुणी बाहेरुन आलं की आपण त्यांना पाण्याचा ग्लास देतो.पण स्री जेंव्हा आपल्या स्वतःच्या घरी दिवसभर काम करून येते त्यावेळी तिला स्वतःच पाण्याचा ग्लास भरून घ्यावा लागतो हे आजचं वास्तव.
घर जरी पुरूषांच्या नावावर असलं तरी घरवाली स्त्री असते.घरातली सगळी काम फक्त स्त्री नेच करायची असतात असा अलिखित नियमच असतो.याला काही पुरुष अपवाद असतीलही पण ही संख्या बोटावर मोजण्यासारखी असेल.स्त्री च्या शोषणासाठी पुरूषांप्रमाणे स्त्री देखील तेवढीच जबाबदार आहे. हे अजूनही तिच्या लक्षात येत नाही. रूढी आणि परंपरेचा तिच्या मनावरचा पगडा आणि मानेवरचं जोखड हळूहळू का होईना पण समतेच्या वाटेपर्यंत यायला पाहिजे हे महत्त्वाचे. एखाद्या स्त्री वर जर अत्याचार झाला तर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटताना समाज अजूनही समतेचा पाईक झालेला नाही .याची बातमी बातमीत जाणीव होते.जेंहा एखाद्या निर्भयावर अत्याचार होतो त्यावेळी समाज पेटून उठतो ही जरी जागरूकता असली तरी भोतमांगे कुटुंबात आई आणि मुली वर अत्याचार झाल्यावर सगळा गाव या घटनेकडे पाठ फिरवतो हि कसली मानसिकता . अत्याचारीत स्त्री ला वेगवेगळ्या जातीच्या चौकटीत फ्रेम करून मग अत्याचाराची तीव्रता ठरवणं समतेच लक्षण निश्चित नाही.
जेंव्हा दिवसाढवळ्या एका प्राध्यापक असलेल्या स्त्री ला भररस्त्यात पेटवून दिलं जात त्यावेळी जवळ असलेल्या कोणत्याही महिलेच्या किंवा पुरूषांच्या मनाला या वेदनेची जाणीव होऊन त्यांनी पेटवणा-या अधम नराला ठेचू नये ही कसली मानसिकता.अशा नराधमांच्या घरात,नात्यात असलेल्या स्रियांना स्त्री ची ही वेदना दिसत नसावी ही समाजमनाची शोकांतिका म्हणावी लागेल.का या स्रियांनी अशा पुरुषाला पकडुन पोलिस चौकित हजर करु नये ? कोणत्याही स्त्री वर अत्याचार होताना, अत्याचार झाल्यावर समाजमनाने शतप्रतीशत प्रतिकार केलाच पाहिजे जे कधी समजणार समाजाला ? वर्तमानपत्रातील जाहीराती पाहिल्यावर त्याचा समाजातील घटकांवर काय परिणाम होत असेल हे स्त्री ला उपभोग्य वस्तू म्हणून दाखवणा-या व्यक्तिंच्या मेंदूत कधीच शिरणार नाही का ? इंटरनेट च्या माध्यमातून पोर्नफोटोग्राफीमुळे होणारे दुष्परिणाम आणि यामुळे घडणारे अपराध याचा कोणीही विचारच करणार नाही का? मुलगा मुलगी एकसमान म्हणनारे आपण मुलींना जन्मापासून जिलेबी, बर्फी आणि पेढ्यात वेगळे करत त्यांच्या आयुष्याची सुरूवात करत असतो हे कधी कळणार? स्त्री समानतेच्या वल्गना करणाऱ्या लोकांनी याचा विचार करायला हवा.समाजातील प्रत्येक व्यक्ती जेंव्हा प्रत्येक मुलीला आपली मुलगी समजुन काळजी घेऊ लागेल तो दिवस स्त्रीयांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा असेल.आज स्त्री शिकली.ती प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर पुरूषाच्या बरोबरीने काम करते.असे कोणतेही क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी स्त्री काम करु शकत नाही. असे असले तरी स्त्री कडे पाहण्याचा द्रष्टिकोन समतामुलक होण्यासाठी कठोर प्रयत्न करण्याची गरज आहे.
यामध्ये शिक्षण घेऊन शिक्षित झालेल्या स्त्री च्या योगदानाची आणि सहभागाची जास्त गरज आहे.रुढी आणि परंपरा पाळताना मी हे असे का करत आहे?हि गोष्ट केल्यास काय होईल आणि नाही केली तर काय होईल? स्त्रीयांच्या प्रती माझी समाजातील जबाबदारी काय आहे? शिक्षण घेणे आणि शिक्षित होणे यातला फरक समजून घेऊन स्त्री ला वस्तू समजणाऱ्या भंपक रूढी आणि संकल्पना सोडून देण्यासाठी अशा स्त्रीयांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.आई ने तिच्या लहान मुलाला स्त्रीयांबद्दलची समता आणि आदर जर प्रत्येक घरात लहानपणापासून शिकवला तर ब-याच अंशी स्त्री समानता रूजली जाईल यात संदेह नसावा.सगळ्या गोष्टी दुस-यांनी कराव्यात असं म्हणनं खूप सोप असतं.प्रत्येक व्यक्ती समाजाचा घटक असते.जर प्रत्येकाने स्वतःपासून स्त्रीयांचा मान ठेवण्याचा, त्यांना समतेन वागवण्याचा,स्त्रीयांच्या श्रमाचा,पावलापावलांवर होणाऱ्या स्त्रीयांचा अत्याचार थांबवण्यासाठी सजग आणि जागृत होण्याचा, स्त्री ही शोभेची बाहुली नसून एक परिपूर्ण व्यक्ती आहे हे समजण्याचा आणि स्त्री ही पुरूषां इतकीच महत्त्वाची व्यक्ती आहे हे समजून घेऊन तसे वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्यास येणारा प्रत्येक दिवस स्त्रीयांसाठी भाग्यशाली महिलादिन असेल.
सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. !!
शिरीष जाधव






















