बारामती ता.०२-: निंबुत ता.बारामती येथील भैरवनाथ पॅनलच्या माजी ग्रामपंचायत सदस्य कावेरी भोसले यांच्यावर सोमेश्वर पॅनेलच्या निर्मला संतोष काळे यांनी ३४ मतांनी मात केली आणि हाच विजय सोमेश्वर परिवर्तन पॅनेलसाठी ‘सत्तापरिवर्तन’ घडविणारा ठरला…..
सुनील निंबाळकर बारामती प्रतिनिधी…
बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील महत्त्वाच्या असणाऱ्या निंबुत ग्रामपंचायतीची निवडणूक यंदा प्रथमच मोठ्या अटीतटीची झाली. पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती प्रमोद काकडे, शेतकरी कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष सतीश काकडे यांच्या गटाला सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे व युवा नेते गौतम काकडे यांनी जोरदार टक्कर दिली. सतीश काकडे यांच्या भैरवनाथ विकास पॅनलचे नऊ उमेदवार विजयी झाले तर सतीश काकडे यांच्याविरोधातील सोमेश्वर परिवर्तन पॅनलचे तब्बल सहा उमेदवार विजयी झाले. बहुचर्चित निंबुत ता. बारामती येथील ग्रामपंचायत सरपंच पदासाठी अनुसुचित जमाती महिलासाठी आरक्षण निश्चित झाले आहे. यामुळे बहुमत पाठीशी असूनही सत्ताधाऱ्यांची पंचाईत झाली आहे. अनुसूचित जमातीचा एकमेव विजयी उमेदवार विरोधी गटाकडे असल्याने सत्तेच्या चाव्या विरोधकांच्या हातात गेले आहेत. या घडामोडींमुळे निंबुत ग्रामपंचायत प्रथमच विरोधी गटाला सरपंच पदाची खुर्ची मिळणार आहे. तालुक्याचे वारे कुठेही फिरले तरी निंबुत मध्ये मात्र स्वर्गीय बाबालाल काकडे व त्यांचे वारसदार पुणे जिल्हा शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांच्या नेतृत्वाखाली गावची सत्ता एकवटली होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सतीश काकडे आणि जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ पॅनेलने ९ जागा जिंकून बहुमत प्राप्त केले त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे युवा नेते गौतम काकडे सोमेश्वर कारखान्याचे संचालक महेश काकडे माजी उपसरपंच उदय काकडे धैर्यशील काकडे सुजित काकडे शशिकांत काकडे आदींच्या सोमेश्वर परिवर्तन पॅनेलने कडवी झुंज देत ६ जागा प्राप्त केल्या.
सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे माजी संचालक बी.जी. काकडे, माजी उपाध्यक्ष दिलीप फरांदे आदींचे त्यांना मार्गदर्शन होते.निवडणुकीपूर्वी निंबुत चे सरपंचपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित झाले होते. राज्य सरकारने हे आरक्षण रद्द केले होते, तरीही विचारपूर्वक दोन्ही गटाने प्रभाग क्रमांक दोन मधून अनुसूचित जमातीच्या महिलांना रिंगणात उतरवले होते. यामध्ये भैरवनाथाच्या माजी ग्रामपंचायत सदस्य कावेरी भोसले यांच्यावर सोमेश्वर पॅनेलच्या निर्मला संतोष काळे यांनी 34 मतांनी मात केली होती हाच विजय सोमेश्वर परिवर्तन पॅनेलसाठी “सत्तापरिवर्तन” घडविणारा ठरला आहे. सहा उमेदवार निवडून आल्यानंतर सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांनी कारखाना कार्यस्थळावर एकत्र येत गुलालाची उधळण करत विजयाचा आनंद उत्सव साजरा केला…