महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड तालुक्यातील कालवडे, विंग आणि उंडाळे उपकेंद्रात सुमारे 5 कोटी 36 लक्ष खर्चाच्या ज्यादा शक्तीचे ट्रान्सफार्मर मंजूर झाले आहेत. त्यामुळे सदर उपकेंद्रातंर्गत गावातील वीजेची अनियमितता दूर होऊन वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. तसेच प्रलंबित असणा-या नवीन वीज जोडण्यांना देखील गती मिळणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खा.श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघातील वीज पुरवठा संदर्भातील प्रश्न मार्गी लागत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून महावितरणच्या 33/11 केव्ही क्षमतेच्या कालवडे, उंडाळे व विंग उपकेंद्रासाठी 5 एमव्हीएच शक्तीचे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफार्मरांना मान्यता मिळाली आहे. यासाठी शासनाच्या कृषी धोरण 2020 अंतर्गत सुमारे 5 कोटी 36 लक्ष निधी मंजूर झाला आहे. उंडाळे उपकेंद्र अंतर्गत मस्करवाडी, येळगाव, गणेशवाडी, येणपे, लोहारवाडी शेवाळवाडी, माटेकरवाडी, चोरमारवाडी, टाळगाव, साळशिरंबे, उंडाळे, घोगाव, वंजारवाडी, विठ्ठलवाडी, मुटलवाडी, गोटेवाडी, काजारवाडी, भरेवाडी, मुळीकवाडी, जिंती, अकाईचीवाडी, शेवाळवाडी (येणपे) बोत्रेवाडी, महारुगडेवाडी, सवादे, तुळसण, म्हासोली, येवती, पाटीलवाडी, शेळकेवाडी, घराळवाडी, विठ्ठलवाडी, पाचुपतेवाडी, लटकेवाडी, कालवडे उपकेंद्र अंतर्गत कालवडे, बेलवडे, कासारशीरंबे, मालखेड, रेठरे खु., वाठार, आटके तर विंग या उपकेंद्रातंर्गत विंग, येरवळे, घारेवाडी, चचेगाव, शिंदेवाडी यासह परिसरातील अन्य गावांना याचा फायदा होणार आहे. सदर उपकेंद्रांच्या वाढलेल्या अतिरिक्त पॉवर ट्रांसफार्मरमुळे कमी दाबाने होणारा विद्युत पुरवठ्यात सुधारणा होऊन सर्व गावांना सुरळीतपणे योग्य दाबाने वीज पुरवठा होणार आहे. विशेषत: शेती पंप व उद्योगांना कमी होल्टेजची येत असलेली समस्या संपुष्टात येणार आहे. याशिवाय ग्राहकांच्या मागणीनुसार नवीन वीज कनेक्शन देणे शक्य होणार आहे.
या कामाच्या मंजुरीसाठी उर्जा मंत्री नितीन राऊत, मुख्य अभियंता सुनिल पावडे, अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, कार्यकारी अभियंता अमित बारटक्के, कार्यकारी अभियंता बुंदीले यांचे सहकार्य लाभले आहे. अशी माहीती खा.पाटील यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.