महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / सातारा : शुक्रवार, दिनांक 26.02.2021 रोजी महाराष्ट्राचे ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे राज्यमंत्री श्री. प्राजक्त तनपुरे यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि तंत्र विद्यालय व कृषि विज्ञान केंद्र,बोरगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली तसेच शेतकऱ्यांशी हितगुज केले.
यावेळी बोलताना शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसाठी कृषि विज्ञान केंद्र च्या माध्यमातून शेतीपूरक उद्योग व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा असा मानस त्यांनी व्यक्त केलं. तदनंतर कार्यक्रम समन्वयक तथा प्राचार्य प्रा. मोहन शिर्के यांनी मान्यवरांचे स्वागत करुन बोरगाव येथे राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी मा. राज्यमंत्री यांनी पेरू सघन लागवड, निशिगंध, हळद, रोपवाटिका, अझोला इ. प्रात्यक्षिकांची पाहणी केली तसेच नव्याने रोपवाटिकेतील रोपांचे निगा राखणेसाठी नव्याने उभारलेल्या पॉलिटनेलचे मा. राज्यमंत्री साहेबांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना मा. तनपुरे साहेबांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध होणारा विद्युत् पुरवठा, वीजबिल योजना तसेच याक्षेत्रात सौरऊर्जेचा वापर याविषयी हितगुज केले, तसेच कृषि विज्ञान केंद्र बोरगाव मार्फत शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी कृषि विज्ञान केंद्र बोरगाव यांच्या मार्गदर्शन खाली चालू असलेल्या प्रात्यक्षिक द्वारे प्रत्यक्ष लाभ कस झाले त्याबाबत माहिती दिली.


















