सातारा :
सातारा जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून दोन हजारच्या घरात रुग्ण आढळू लागल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला असून हॉस्पिटलसह कोरोना केअर सेंटर ही कमी पडू लागली आहेत. जम्बो, सिव्हिल हाऊसफुल्ल झाले असून जिल्ह्यातील 3 हजार 666 बेड पैकी अवघे 567 बेड रिकामे आहेत. बाधितांचा आकडा वाढू लागल्याने दोन दिवसात हे बेड अपुरे पडणार असे चित्र दिसत आहे.
जिल्ह्यात गेल्या 13 महिन्यापासून कोरोनाचा कहर सुरु आहे. गेल्या 15 दिवसापासून दोन हजाराच्या घरात पॉझिटीव्ह रुग्ण आढळत आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढला असून यंत्रणा अपुरी पडू लागली आहे.
गेल्या महिनाभरात सातारा, फलटण, कराड या तीन तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळल्याने हॉटस्पॉट बनले आहेत.
सध्या जिल्ह्यात 3 हजार 666 बेड आहेत. त्यापैकी आयसीयूचे 360 बेड असून त्यातील 325 बेड फुल्ल झाले असून 35 बेड रिक्त आहेत. व्हेंटिलेटरचे 225 बेड असून 211 फुल्ल झाले असून 14 बेड रिक्त आहेत. ऑक्सिजन 2 हजार 401 बेड असून 2 हजार 56 फुल्ल झाले असून 345 बेड शिल्लक आहेत. तर साधे बेड 680 असून त्यातील 507 बेड फुल्ल झाले असून 173 बेड रिक्त आहेत. सध्या जिल्हा कोविड सेंटरमधील व्हेटींलेटर बेड भरलेले आहेत. जिल्ह्यात आयसीयू व व्हेंटिलेटर बेडची कमतरता आहे. आता बेडचा विचार केला तर 567 च्या घरात बेड शिल्लक आहेत. यात व्हेंटिलेटर बेडची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्यातच सध्या रुग्ण वाढत असून ऑक्सिजन आणि नॉन ऑक्सिजन बेडची कमतरता रुग्णालयांना भासणार आहे. जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या पाहता आयसीयू व्हेंटीलेटर बेडची कमतरता आहे. जिल्हा कोविड सेंटरमध्ये व्हेंटीलेटर बेड फुल्ल झाले आहेत. त्यामुळे नातेवाईकांना बेडसाठी धावपळ करावी लागत आहे.