जगाच्या इतिहासात अशा काही अद्वितीय व्यक्ती जन्माला येतात कि त्या सबंध कालचक्रालाच आपल्या कल्पनेप्रमाणे गती देतात. यातच त्यांचे मोठेपण सामावलेले असते. आणि हे विचार क्रांतिसिंह नाना पाटील यांना तंतोतंत लागू पडतात.
नाना पाटील यांचा जन्म ३ ऑगस्ट १९०० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र या गावी झाला. लहानपणापासूनच दणकट शरीरयष्टी लाभलेल्या नानांनी भारताला सामाजिक आणि राजकीय गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी तीव्र संघर्ष केला.
स्वातंत्र्यपूर्व काळात ‘आधी राजकीय स्वातंत्र्य कि सामाजिक सुधारणा’ असा वाद अस्तित्वात होता. काहींनी आधी राजकीय स्वातंत्र्य योग्य मानले तर काहीना आधी सामाजिक सुधारणा इष्ट वाटत होत्या. परंतु नानांनी राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचे महत्कार्य पार पाडले, हे क्रांतिसिंहांच्या कार्याचे वेगळेपण आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राने विशेषतः सातारा-सांगली भागाने बहुमोल योगदान दिले आहे. याच भागातून पुढे आलेल्या क्रांतिसिंहांनी समविचारी तरुणांना एकत्र करून भारतीय स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली.
क्रांतिसिंह नाना पाटील सुरुवातीला तलाठी म्हणून नोकरीला होते. परंतु स्वातंत्र्याचे आंदोलन ऐन जोमात असताना त्यांचे मन नोकरीत रमले नाही. त्यांनी नोकरी सोडून सक्रीय राजकारणात व समाजकारणात सहभाग घेतला. सातारा भागात प्रतिसरकार ही समांतर शासनव्यवस्था उभी करून ब्रिटीश सत्तेला चांगलाच चाप लावला.
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी तुफान सेना ही सशस्त्र क्रांतीकारकांची संघटना बांधली. तुफान सेनेच्या माध्यमातून इंग्रजी सत्तेला सळो कि पळो करून सोडले. ब्रिटीश सत्तेचा प्राण असणाऱ्या रेल्वे सेवा, पोस्ट सेवा आदी सेवांवर हल्ले करून, ब्रिटीशांचा खजिना लुटून नानांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी त्याचा उपयोग केला.१९३० चे सविनय कायदेभंग आंदोलन आणि १९४२ चे चाले जाव आंदोलन यात नानांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. १९४२ पर्यंत नानांनी अनेकवेळा तुरुंगवास भोगला. १९४२ नंतर मात्र नाना भूमिगत झाले. ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले. त्यांच्या घरावर जप्ती आणली. त्यांच्या कुटुंबियांना त्रास दिला. नानांची जमीनही सरकारजमा केली गेली. परंतु घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्याच्या भुकेने बाहेर पडलेल्या नानांचा त्याग ब्रिटिशांना काय माहित ? या धावपळीच्या काळात आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला नानांना वेळ मिळाला नाही. यातच नानांच आजींचे निधन झाले. स्वतःच्या आजीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी तरी नाना येतील म्हणून ब्रिटिशांनी पूर्ण बंदोबस्त लावला. तेव्हा नानांनी आपला जीव धोक्यात घालून आजीचे अंत्यसंस्कार केले. मात्र ब्रिटिशांच्या तावडीत ते सापडले नाहीत.
सामान्य जनतेची क्रांतिसिंहांना फार मोठी साथ लाभली. समाज नानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने ब्रिटीश सरकार क्रांतिसिंहांना पकडू शकले नाही. भारताला अधिकृतरीत्या १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी सातारा सांगली भाग नानांच्या प्रयत्नांमुळे १९४२ पासूनच स्वतंत्र झाला होता.
सातारा-सांगली भागात प्रतिसरकार कार्यरत असताना ब्रिटीश सत्तेचा मागमूस या भागातून जवळजवळ पुसून टाकण्यात आला होता. नानांनी प्रतीसरकारच्या माध्यमातून जसे ब्रिटीशांविरुद्ध सशस्त्र आंदोलन उभे केले होते तसेच समाजात एक चांगली शासनव्यवस्था निर्माण केली होती. भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयाची स्थापना करण्याचे महत्वाचे कार्य नानांनी केले होते. व्यसनमुक्तीसाठीही नानांनी प्रतीसरकारच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले.
गोरगरीब समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या खांद्याला खांदा लावून नाना उभे होते. गावोगावी ग्रंथालये उभी करून समाजपरिवर्तनात मोलाची कामगिरी बजावली. नानांवर महात्मा फुल्यांचा व सत्यशोधक समाजाच्या विचारांचा विशेष प्रभाव होता. सावकारशाही गरीब शेतकऱ्यांना नाडत आहेत म्हणून नानांनी या प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामीही नानांचे योगदान खूप आहे. सातारा-सांगली भागात सुमारे १५०० गावात नानांचे प्रतिसरकार कार्यरत होते. शेतकऱ्यांवर होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला प्रतिसरकारच्या माध्यमातून वाचा फोडली जाई. त्यामुळे सामान्य जनतेला प्रतिसरकार आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबद्दल फार आत्मीयता होती.
सामान्य जनतेच्या सहभागावर आधारलेला विकेंद्रित लोकशाहीचा छोटा पण वेगळा प्रयोग म्हणजे प्रतिसरकार होय. नानांच्या प्रतीसरकारचा प्रयोग देशात इतरत्रही राबवला गेला. दारूबंदी, न्यायव्यवस्था, गुंडांचा बंदोबस्त, अस्पृश्यता निवारण, सावकारांकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवणे, कमी खर्चात लग्ने लावणे असे प्रतीसरकारचे कार्यक्रम सामान्य बहुजन समाजाने उचलून धरले. समाजाला नाडणाऱ्या सावकारादि प्रवृत्तींना नानांच्या प्रतीसरकारचा चांगलाच धाक होता.
गरीब शेतकऱ्यांवर, गोरगरीब समाजावर अन्याय करणाऱ्या बड्या धेंडांना प्रतीसरकारने पत्र्या ठोकल्या. त्यामुळे प्रतीसरकार हे ‘पत्रीसरकार’ म्हणूनही ओळखले जावू लागले. आज खर्चिक विवाह समाजामध्ये आर्थिक व सामाजिक ताण निर्माण करताना दिसत आहेत. परंतु त्याकाळी फक्त पंधरा रुपयात बहिणीचा व वीस रुपयात मुलीचा विवाह करणारे क्रांतिसिंह खरोखर कृतीवीर होते.
स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर गोरगरीब, दीनदलित व शोषितांसाठी आयुष्यभर लढत राहणाऱ्या क्रांतीसिहांच्या कर्तुत्वाची महती आजच्या पिढीला समजली पाहिजे. सध्या स्त्री-शिक्षण व स्त्री सक्षमीकरणावर बोलले जात असले तरी शंभर वर्षापूर्वी स्वताच्या पत्नीला साक्षर करून समाजाला नवी दृष्टी देणारा हा दूरदृष्टा विरळच होता. या भूमीतील कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात पोहचवली, तर क्रांतीसिहांनी स्वातंत्र्य चळवळीचे, सामाजिक सुधारणांचे लोण गावोगाव पसरवले. स्वातंत्र्य चळवळीबरोबरच त्यांनी शिक्षणप्रसार, स्त्री शिक्षण, व्यसनमुक्ती, हुंडाबंदी, जातीभेद निर्मुलन, अंधश्रद्धा निर्मुलन यासारख्या विषयांवरही सामाजिक प्रबोधन केले. “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” या उक्ती क्रांतिसिंहांना तंतोतंत लागू पडतात.
क्रांतिसिंहांनी यावेळी जनजागृतीसाठी केलेले दौरे महाराष्ट्रभर तुफान व वेगवान असे झाले. सर्वत्र नाना पाटील, जेधे, मोरे, जाधव आदींचा जयजयकार होवू लागला.नाना फक्त एक लढाऊ स्वातंत्र्यसैनिक होते असे नाही तर ते एक उत्तम वक्ते, पुरोगामी विचारवंत होते. त्यांचे विचार सहज-सुलभ व सर्वसामान्यांना समजेल असे होते. भाषांशैली लोकाभिमुख होती. आपल्या विचारांमुळे व कार्यामुळे ते सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय झाले होते. ते १९५७ साली सातारा उत्तर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर बीड मतदारसंघातून निवडून आले. शेकाप व कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून नानांनी बहुजन समाजाच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.




















