आज तरुणांमध्ये राज्यकर्ते, आणि शासनाची धोरणे यांच्याबाबत खूप मोठ्या प्रमाणात असंतोष दिसून येत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वाढती “बेरोजगारी”. अनेक युवक – युवती भरमसाठ पैसे भरून उच्चशिक्षण घेत आहेत तर काही उच्चशिक्षण पूर्ण करून नोकरीच उपलब्ध नसल्याचे घरी आहेत तर काही तरुण हे बाजारातील मंदी, तयार मालाला असणारी अपुरी मागणी, नोटबंदी आणि GST नंतर कंपनीच्या आर्थिक स्थिती वरती झालेले परिणाम यामुळे कंपनीने नोकरीमधून कमी केलेले आहेत. काही जण नोकरी करताहेत परंतु कौटुंबिक जबाबदारी आणि दुसरा पर्याय नसल्याने तुटपुंजा पगार देखील स्वीकारत आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसीचे राथीन रॉय असा युक्तिवाद करतात की भारत सध्या स्ट्रक्चरल डिमांड समस्येचा सामना करीत आहे आणि यामुळे विशिष्ट धोरण निवडणे गुंतागुंतीचे ठरते आहे. राईजस्मार्टच्या ‘ब्रेव्ह द चेंज’ सर्वेक्षणात, भारतातील मध्यम-आकाराच्या आणि मोठ्या उद्योगांमधील एक हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणातील ४२% कर्मचार्यांनी सांगितले की, त्यांना नोकरीतून काढण्यात आले आहे, आणि ६२% कर्मचाऱ्यांना मागील वर्षी काढण्यात आले होते. यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांची संख्या अधिक आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या मते, भारताच्या बेरोजगारीचा दर ऑगस्ट २०२१ मध्ये पुन्हा तीन वर्षांच्या उच्चांकी पातळीवर ८ टक्के झाला आहे.
शिक्षण घेण्यासाठी खर्च केलेला पैसा, शाश्वत नोकरीची कमतरता , कौटुंबिक जबादारी यामुळे वाढणारा मानसिक ताण या सर्वांचा तरुणांच्या मानसिकतेवरती खुप खोल परिणाम होत आहे. परंतु अश्या कठीण प्रसंगी खचून न जाता उपलब्ध वेळेचा सकारात्मक वापर करणे आवश्यक आहे. काही अतिशय गरजेच्या गोष्टी आहेत कि ज्या आत्मसात करणे जरुरीचे आहे ज्यामुळे स्वतःमध्ये ३६० अंश प्रमाणात बदल होईल. सध्या ज्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध आहेत त्या प्राप्त करण्यासाठी स्वतःमध्ये गुणवत्ता असणे गरजेचे आहे कारण अपुऱ्या संधी आणि मागणी जास्त यामुळे ज्याच्या जवळ विशिष्ट गुणवत्ता, कौशल्य आहेत अशाच तरुणांना प्राधान्य दिले जाते.
- मृदु कौशल्य विकसित करणे— मृदू कौशल्य म्हणजेच वैयक्तिक गुणधर्म जे एखाद्यास प्रभावीपणे आणि सुसंवादीपणे इतर लोकांशी संवाद साधण्यास सक्षम करतात. यामध्ये प्रामुख्याने Leadership Skills, Teamwork, Communication Skills, Problem Solving Skills, Work Ethic, Flexibility, Adaptability and Interpersonal Skills इ. कौशल्यांचा समावेश होतो. करिअरच्या संक्रमणादरम्यान स्पर्धात्मक राहणे आणि भविष्यातील गतिशीलतेसाठी योग्य कौशल्ये घेणे अतिशय महत्वाचे आहे.
- व्यक्तिमत्व विकास— व्यक्तिमत्व विकास ही विशिष्ट वैशिष्ट्ये आणि वैशिष्ट्यांचा संच विकसित करण्याची प्रक्रिया आहे जी एखाद्या व्यक्तीच्या एकूण व्यक्तिमत्त्वात योगदान देते. एखादी व्यक्ती चांगली पोशाख करते आणि अस्खलित इंग्रजी बोलते तेव्हा त्याचे व्यक्तिमत्व उत्कृष्ट आहे असे नसते. एखाद्याचे व्यक्तिमत्व विकसित करताना अनेक वैशिष्ट्ये यावर कार्य करणे आवश्यक आहे जसे Confidence, Appearance, Passion for Work, Body Language, Social Skills, Listening and Continuous Learning इ. व्यक्तिमत्वाचा योग्य विकास झाला तर भविष्यातील उपलब्ध होणाऱ्या संधी सहजरित्या प्राप्त करता येतील.
- भावनांशी सामना करण्याची कला विकसित करणे— उच्चशिक्षित आहे परंतु बेरोजगार असणे अथवा चांगल्या पगाराची नोकरी होती परंतु सध्या नोकरी नसणे याचा थेट व्यक्तीच्या भावनेशी संबंध असतो. मी बेरोजगार असल्याने समाजात लोक मला वेगळ्या नजरेने बघतील असा न्यूनगंड तयार होतो आणि त्यामुळे व्यक्तीचा मानसिक ताण वाढत जाऊन व्यक्तीमध्ये औदासिन्य निर्माण होते. औदासिन्य ही एक सामान्य मानसिक विकृती आहे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचे विचार, भावना, वर्तन, नातेसंबंध, इ . वर परिणाम होतो आणि अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये आत्महत्या आणि मृत्यूच्या विचारांनाही कारणीभूत ठरते. यावरती मात करण्यासाठी मन स्थिर ठेवण्यासाठी काही गोष्टी आत्मसात करणे जरुरीचे आहे जसे नियमित योगा व व्यायाम करणे, मनात येणारे नकारात्मकतेचे चक्र खंडित करणे , चांगल्या कामांमध्ये सक्रिय राहणे, मित्र परिवार, कुटुंब आणि नातेवाईक यांचेशी सतत संवाद ठेवणे , मनात येणारी भावना लपवून न ठेवता इतरांशी बोलून मन हलकं करणे , आवश्यक उपचार किंवा थेरपी नियमितपणे करणे इ.
- आपले नेटवर्क वाढवा— नेटवर्किंग ही अशी एक गोष्ट आहे की ज्याच्या माध्यमातून आपण कला , क्रीडा , उद्योग-व्यवसाय , शिक्षण इ. क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांशी भ्रमणध्वनी, ई-मेल या माध्यमातून संपर्कात राहणे. जेणे करून आपल्या इच्छीत क्षेत्रामध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाल्यास त्याची माहिती त्वरित आपल्याला मिळेल. तसेच विशिष्ट प्रकारची नोकरी मिळविण्यासाठी कोणत्या गोष्टी आत्मसात करण्याची गरज आहे आणि त्या कोणत्या पद्धतीने आत्मसात कराव्यात याची बरोबर माहिती आपल्याला मिळते.
- पर्याय क्रमांक २ (Option B)— करिअरमध्ये बदल करणे सोपे नाही अन्यथा प्रत्येकाणे ते केले असते . पण हे शक्य आहे. अशा अनेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या यशोगाथा की आहेत ज्यांनी आपल्या मूळ करिअरमध्ये बदल करून नवीन क्षेत्रामध्ये उतुंग झेप घेतलेली आहे. आणि लक्षात ठेवा, हे फक्त आपल्या कारकीर्दीबद्दल नाही; हे तुमच्या आयुष्याबद्दल आहे. त्यामुळे करिअरचा दुसरा पर्याय (Option B) निर्माण करावा जेणे करून सध्या ज्या क्षेत्रामध्ये आपण करिअर घडवू इच्छीत त्यामध्ये दुर्दैवाने अपयश आले तर खचून न जात त्यावरती कशी मात करता येईल याचा अभ्यास करणे आणि तरीही ते अशक्य वाटत असेल तर करिअरचा दुसरा पर्याय निवडावा.
- व्यावसायिक नेटवर्किंग आणि जॉब साइटचा योग्य वापर— आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आहोत वावरत आहोत. इंटरनेटच्या माध्यमातुन कोणत्याही प्रकारची माहिती आपल्याला घरबसल्या सहजरित्या मिळवता येते. त्यामुळे याचा योग्य वापर करणे हि काळाची गरज आहे. एखाद्या कंपनी मध्ये उपलब्ध असलेल्या जागा आणि त्याची माहिती हि आज रोजगाराची माहिती देणाऱ्या वेबसाईट वरती सहज उपलब्ध होते. त्यामुळे आपला बायोडाटा अश्या वेबसाईट वरती असणे आवश्यक आहे जेणे करून उपलब्ध जागांची माहिती त्वरीत ई-मेल च्या माध्यमातून आपणास मिळेल. तसेच अनेक व्यावसायिक नेटवर्किंग साईट्स आहेत जेथे आपण आपली माहिती विशिष्ट पद्धतीने ठेवता येते त्याचाही वापर करण्याची कला अवगत करणे गरजेचे आहे.
बेरोजगारी हे संकट आहे आणि शासन त्यांच्या पद्धतीने बेरोजगारी हटविण्यासाठी उपाययोजना करत आहे . त्यामुळे खचून न जाता मिळालेला वेळ हि एक सुवर्ण संधी आहे ज्याचा योग्य वापर करून स्वतःमध्ये विशिष्ट बदल करणे आवश्यक आहे. आपण स्वतःमध्ये एवढी गुणवत्ता निर्माण करणे गरजेचे आहे कि उद्या कोणत्याही क्षेत्रामध्ये जात असताना तेथे असणाऱ्या इतर तरुणांच्या तुलनेत आपलं नाणं खणखणीत असावं.
डॉ. प्रविण विठ्ठल यादव
Ph.D, M.Com, MBA, MCM
अनेकान्त एज्युकेशन सोसायटी,
अनेकान्त इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, बारामती
मो. 8888340340