कराड : कराड तालुक्यातील तांबवे पुलानजीक नदीपात्रामध्ये ग्रॅनाईट बॉम्ब सापडले. कराड तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली असून, पंचनामा करण्याचे काम सुरू झाले आहे. याला पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.आज दि. सोमवार 17 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही बाब समोर आलीकराड तालुक्यातील साकुर्डी फाटा येथून जवळच असलेल्या तांबवे पुलानजीक नदीपात्रामध्ये सोमवारी सकाळी काही युवक मासेमारी करण्यासाठी गेले होते.
मासे पकडण्यासाठी त्या युवकांनी नदीच्या पाण्यामध्ये जाळी टाकल्यानंतर त्यांच्या गळाला मासा लागला असल्याचा अंदाज आल्याने त्यांनी तो गळ नदीच्या पात्रातून पाण्याबाहेर काढला. त्यावेळी त्यामध्ये ग्रॅनाईट (बॉम्ब) असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते अतिशय अवजड असल्याने त्यांना त्याबाबत शंका आली. मासेमारी करणाऱ्या युवकांनी याबाबत त्वरित पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, सापडलेले ग्रॅनाईट सैन्य दलाचे असावेत असा अंदाज व्यक्त केला जात असून, त्याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी दहशतवाद विरोधी पथकाने भेट दिली असून, माहिती घेण्याचे काम सुरू आहे.नदीत हे जिवंत बॉम्ब कसे आले, याची चौकशी सुरू आहे.