उरमोडी उजवा कालव्याचे जलपूजन उत्साहात
सातारा- सातारा तालुका सुजलाम सुफलाम व्हावा, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला हक्काचं पाणी मिळावं म्हणून स्व. भाऊसाहेब महाराजांनी उरमोडी धरण बांधून जलक्रांती घडवली. आज उरमोडी धरणाचे पाणी सातारा तालुक्यातील शेतकऱ्याच्या शिवारात पोहचले असून स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साकार झाले आहे. लवकरच काशीळ पर्यंत उरमोडीचे पाणी पोहचेल आणि संपूर्ण तालुक्याचा पाणीप्रश्न सुटेल असे आश्वासक प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अथक पाठपुराव्यातून मार्गी लागलेल्या उरमोडी उजवा कालव्यातून धरणाचे पाणी सोडण्यात आले आहे. करंडी, उपळी या गावांच्या मधून जाणाऱ्या या कालव्यात आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, सातारा पालिकेचे नगरसेवक धंनजय जांभळे, करंडीचे सरपंच शशिकांत जाधव, पोगरवाडीच्या सरपंच सुलाबाई लोहार, उद्धव घोरपडे, उपळीच्या सरपंच मंगल पवार, माजी सरपंच संदीप पवार, आष्टेचे उपसरपंच सुनील भोसले, झरेवाडीच्या सरपंच ज्योती नगरे, सुमन पवार, अमोल काटकर आदी उपस्थित होते.
उरमोडी धरणाच्या उजव्या कालव्यामुळे अंबवडे, भोंदवडे, गजवडी, सोनवडी, आरे, पोगरवाडी, झरेवाडी, करंडी, उपळी, आष्टे, शेळकेवाडी आदी गावांतील सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. हा कालवा दहा किलोमीटर लांबीचा असून कालव्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे भाग्य उजळून निघाले आहे. पाणी शिवारात पोहचल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करून आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानले. दरम्यान, पुढे काशीळ पर्यंत जाणाऱ्या या कालव्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा आणि उजव्या कालव्याच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न संपुष्टात आणा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.