सुनील निंबाळकर / बारामती प्रतिनिधी
स्टेट बँक ऑफ इंडिया फौंडेशनच्यावतीने बारामती येथील शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोन रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या. त्याचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी ‘एसबीआय’चे मुख्य महाव्यवस्थापक अजय कुमार सिंग, महाव्यवस्थापक श्रीमती सुखविंदर कौर उपस्थित होते. तसेच मयुरेश्वर प्रतिष्ठान सुपे परगणा यांच्या मार्फत १५ सॅनिटायझर व सुपे येथील ८५ निराधार, विधवा व दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी १००१ रुपयांचा धनादेशाचे वाटप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मयुरेश्वर प्रतिष्ठानचे सुशांत जगताप व तुषार हिरवे उपस्थित होते. याचबरोबर मॅग्नम एन्टरप्रायझेस यांच्याकडून कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी लागणारी काही औषधे व कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामुग्री मदत म्हणून देण्यात आली. बारामती येथील हॉटेल डोसा प्लाझाचे योगेश भगवान पानसरे व दिनेश मोहन पानसरे यांच्याकडून देखील कोविड १९ साठी मदत म्हणून २५ हजारांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.