दहिवडी : ता.१२
धनगर समाजाचा आजवरचा एकनिष्ठ चेहरा म्हणून ओळख असलेल्या अर्जुन काळे यांची एकनिष्ठता पचनी पडलेली दिसत नाही, अशी चर्चा माणमधील धनगर समाज बांधवांमध्ये रंगली आहे. या चर्चेचे कारण आहे , श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदाची निवड. या निवडप्रक्रियेत प्रबळ दावेदार असलेल्या अर्जुन काळे यांच्याऐवजी अरुण गोरे यांना चेअरमनपद दिले गेले, तर किंगमेकर असलेल्या मामुशेठ वीरकर यांना व्हाईस चेअरमनपद देत धनगर समाजाची निव्वळ बोळवण केल्याचाही आरोप होत आहे. सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजता सिद्धनाथ पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात नूतन संचालक मंडळाची पहिली मासिक सभा पार पडली.यादरम्यान अध्यासी अधिकारी शंकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या. यामध्ये चेअरमनपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून अरुण गोरेंसोबत अर्जुन काळे यांचेही नाव चर्चेत होते. निवडणूक झाल्यानंतर जवळपास विरोधकांसह सर्वांनाच अर्जुन काळे हे चेअरमन होतील असा अंदाज होता. मात्र सर्वांच्याच अंदाजाची गणिते फोल ठरल्याने त्यानुसार अर्जुन काळे यांना डावलल्याची मोठी चर्चा सहकार आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आमदार जयकुमार गोरे यांचे आजपर्यंतचे एकनिष्ठ सहकारी म्हणून अर्जुन काळे यांना दस्तुरखुद्द आमदार गोरे आणि भाजपने मुद्दाम डावलले, अशी मते समाजातील विविध व्यक्तींकडून व्यक्त करण्यात येत आहेत.
आमदार जयकुमार गोरेंना अर्जुन काळे यांनी आजपर्यंत खंबीर साथ दिली आहे. तीनवेळा आमदार गोरेंना आमदार करण्यात अर्जुन काळे यांची मोलाची भूमिका राहिली आहे. मात्र अर्जुन काळे यांना आमदारांनी डावलून त्यांचे खच्चीकरण करण्याची नेमकी काय गरज होती? असे सवालही या निवडीनंतर उपस्थित होत आहेत.
अर्जुन काळे यांना डावलल्यानंतर धनगर समाजात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. त्यानुसार आगामी निवडणूकांच्या दृष्टीने धनगर समाज कशी भूमिका घेतो, हे पाहणे सर्वांच्याच दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे.