*तुर्तास बास..!*
*मधुसूदन पतकी*
*गंभीर आरोप असताना तपासी यंत्रणांनी आपली चौकशी कशी करावी याची विनंतीवजा सूचना करणाऱ्या आमदार अनिल देशमुखांना राज्यातले महान व्यक्तिमत्त्व म्हणावे लागेल.अर्थात न्यायव्यवस्थेवर आपल्या सगळ्यांचाच विश्वास आहे. ती व्यवस्था निवाडा करेलच ;
पण वय जसजसं वाढत जाते तसतसा अट्टल राजकारण्यांचा खोटेपणा वाढत जातो हेही नक्की.*
पोलिसांना पैसे गोळा करण्याचे उद्दिष्ट दिल्याच्या गंभीर आरोपावरून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावे लागणारे आमदार अनिल देशमुख यांनी आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी प्रत्यक्ष येण्यास असमर्थता दर्शवली . त्यांच्या पत्रा नुसार त्यांचे वय आणि आजारपण पाहता प्रत्यक्ष चौकशी ऐवजी ऑनलाइन चौकशी करावी अशी विनंती त्यांनी तपासणी संस्थेला म्हणजेच ईडीला केली आहे . आमदार देशमुख यांचे सध्याचे वय ७२ वर्षे आहे . गंमत अशी आहे की आमदार देशमुख यांनी गृहमंत्री पद त्यांच्या वयाच्या सत्तराव्या वर्षी स्वीकारले . पुढील पाच वर्ष आपण गृहमंत्री असणार म्हणजेच ७५ वर्षा पर्यंत आपण गृहमंत्री राहून उत्तम शारीरिक आणि मानसिक क्षमतेने काम करू असा विश्वास असल्यामुळे त्यांनी हे पद स्वीकारले असावे. कदाचित सेवंटी की सेव्हन्टीन याचा घोळ त्यांचा कदाचित झाला असावा . असो . साठी बुद्धी नाठी असे म्हणतात . आमदार देशमुख यांचे वय त्यापुढे बारा वर्षे गेल्याने एका तपाच्या तपश्चर्या आणि अनुभवामुळे चौकशी लांबवण्याचे नवनवीन फंडे त्यांना नक्कीच आत्मसात झाले असतील .
*कुठे हे अन् कुठे ते..!*
आमदार अनिल देशमुख यांना ईडीच्या चौकशीचे समन्स आल्यावर त्यांना आपल्या वयाची जाणीव झाली . तसेच आजाराची जाणीव झाली हे एक बरे झाले . ओबीसींना त्याच्या हक्काचे आरक्षण मिळवून दिले नाही तर राजकारण संन्यास तेही वयाच्या चाळीसाव्या वर्षाच्या आत बाहेर घेण्याची प्रतिज्ञा करणारे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि जोखमीची गृहमंत्रालयाची जबाबदारीची सत्तराव्या वर्षी उत्साहाने घेऊ इच्छिणारे आमदार देशमुख यांची तुलना केली तर आमदार देशमुख यांना राजकारणाचा संन्यास घेण्याची इच्छा कधी होणार असा प्रश्न पडतो . प्रकरण नरड्याशी आल्यावर वय आणि आजारपण आठवणारे आमदार अनिल देशमुख कोविडचे जगतिक संकट नसते तर राज्याचा कारभार रुबाबात करताना दिसले असते. सरकारी पैशाने उपचार घेताना दिसले असते. तेंव्हा वय आडवे आले नसते. अर्थात प्रामाणिकपणाची चाडा अशा व्यक्तींमध्ये असेल असे कधीच जाणवत नाही . अत्यंत गंभीर आरोपावरून ज्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला . त्या व्यक्तीला शासनाने सोय म्हणून दिलेला शासनाचा बंगला अद्याप सोडावासा वाटत नाही , त्या व्यक्तीकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा काय करावी ?
*पारख चुकली ?*
राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री शरद पवार माणूस पारखी आहेत . व्यक्तीच्या स्वभाव , कार्यशैलीची त्यांना उत्तम परीक्षा आहे . श्री. शरद पवार यांनी आमदार देशमुख यांची बाजू घेत केंद्र सरकारवर टीका केली . ईडी सारख्या यंत्रणांचा ससेमिरा आमदार अनिल देशमुख यांच्या मागे लावल्याचा आरोपही केला . पण दिवसेंदिवस ज्यांचा पाय खोलात जातो आहे , ज्यांच्यात नीतिमत्तेचा अंशही शिल्लक नाही , संशयास्पद कृत्यांनी ज्यांची कार्यपद्धती सजलेली आहे असे आरोप विरोधक ज्या व्यक्तींवर करतात अशा व्यक्तींची पाठराखण करण्यात श्री. शरद पवार यांच्याकडून गल्लत झाली का ? की अपरिहार्यता आहे? गृहमंत्री पद स्वीकारल्यानंतर पैशाची अफरातफर करणाऱ्या वाधवान बंधूंना कडक लॉकडाऊन मध्ये सहकुटुंब , सहपरिवार मुंबई ते महाबळेश्वर फिरण्याचा परवाना देणारे आमदार अनिल देशमुख ; पळवाटा,खोटारडेपणा , कातडीबचाऊ धोरण अवलंब करण्याशिवाय दुसरे काय करू शकतात ? पोलिसांना पैसे गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यासारखा गंभीर आरोप असताना तपासी यंत्रणांनी आपली चौकशी कशी करावी याची विनंतीवजा सूचना करणाऱ्या आमदार अनिल देशमुखांना राज्यातले महान व्यक्तिमत्त्व म्हणावे लागेल.अर्थात न्यायव्यवस्थेवर आपल्या सगळ्यांचाच विश्वास आहे. ती व्यवस्था निवाडा करेलच ;
पण वय जसजसं वाढत जात तसतसा अट्टल राजकारण्यांचा खोटेपणा वाढत जातो हेही नक्की. तूर्तास एवढेच ,एवढ्यावरच बास..!
.
मधुसूदन पतकी