पाटण प्रतिनिधी : कोयना नदीवर असणारा मूळगावचा पूल हा पावसाळ्यात कोयना नदीला आलेल्या पुरामुळे सातत्याने पाण्याखाली जात असल्याने दळणवळण पूर्णत: बंद होवून पलिकडील सात गावांचा पाटणशी संपर्क तुटतो. त्यामुळे कोयनानदीवरील पूलाची उंची वाढवावी अथवा शेजारी नवीन उंच पूल व्हावा, अशी मागणी मूळगावच्या ग्रामस्थांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत पालकमंत्र्यांनीही ग्रामस्थांची म्हणणे ऐकून घेत लवकरच यावर मार्ग काढू, असे आश्वासनही दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या माध्यमातून मूळगाव, कवरवाडी, चोपडी, त्रिपुडी, बेलवडे, आंब्रुळे ही गावे पाटणशी जोडण्यासाठी कोयना नदीवर पूल बांधण्यात आला. त्यामुळे मूळगावसह पलिकडील सात ते आठ गावांचा पाटणशी संपर्क जोडला गेल्याने येथील ग्रामस्थांची चांगली सोय झाली आहे. मात्र या पुलाची उंची कमी असल्याने आणि दिवसेंदिवस पाटण तालुक्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वाढत असून अतिवृष्टीमुळे व कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कोयना नदीला महापूर येवून सातत्याने हा पूल दहा-दहा, बारा-बारा दिवस पाण्याखालीच असतो. त्यामुळे पलिकडील गावांचा पाटणशी संपर्क तुटतो. पुलावरील पाणी ओसरेपर्यंत वाट पहावी लागते.
पुलावर पाणी असल्याने दळणवळण ठप्प होवून पाटण शहरात शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. वयोवृध्द लोकांना दवाखान्यात न्यायचे म्हटले तर कोणतीच सुविधा उपलब्ध होत नाही. दूध व्यवसायही अडचणीत येतो. परिणामी मूळगावसह इतर गावातील नागरीकांचे मोठे हाल होत असून अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते. याचा सारासार विचार करून कोयनानदीवरील मूळगाव पुलाची उंची वाढवावी अथवा येथे पर्यायी जास्त उंचीचा नवीन पूल व्हावा, अशी मागणी करत साकडे पालकमंत्र्यांना घातले आहे. यावर पालकमंत्र्यांनीही ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेवून यावर लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासनही दिले आहे.
यावेळी मूळगाव ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गुरव, सौ. कविता सुपूगडे, माजी उपसरपंच शिवाजी मोळावडे, एकनाथ चव्हाण, श्रीगणेश गायकवाड, त्रिपुडीचे माजी सरपंच जनार्दन पवार, चोपडी गावचे सुभाष जाधव, तानाजी खाडे, जगन्नाथ मोळावडे, आनंद मोळावडे, विलास सुपूगडे, रामचंद्र सुपूगडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.






















