महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी \ कराड
शेतकरी व सामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नाबाबत वीज दरवाढीच्या विरोधात अतुल भोसले यांच्या वतीने आज कराडमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. शेतीपंपासाठी पूर्वी प्रतियुनट पेक्षा जास्त दर आकारून शेतकऱ्यांची मोठी लूट केली जात आहे. वीजदरवाढ तातडीने रद्द करावी, या सर्व गोष्टीची दखल घ्यावी असे निवेदन महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीला तसेच कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आले.
शेतीपंपासाठी पूर्वी प्रतियुनिट १ रुपये १६ पैसे दर आकारला जात होता. तो आता प्रतियुनिट ४ रुपये ३५ पैसे आकारून शेतकऱ्यांची मोठी लूट केली जात आहे. शेतीपंपाच्या बिलासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे शेतीपंपासाठी आकारला जाणार दर पूर्वीप्रमाणेच प्रतियुनिट १ रुपये १६ पैसे दरानेच आकारला जावा, तसेच ३ ते १०० युनिटपर्यंत घरगुती कारणासाठी वीजेचा वापर करणाऱ्या लोकांना मोफत वीज देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. या घोषणेची तातडीने अंमलबजावणी करून राज्य शासनाने नागरिकांना ताबडतोब दिलासा द्यावा. महावितरणचे थकबाकीदार असणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याचे कुठलेही आदेश दिले नसताना, महावितरणचे काही अधिकारी व कर्मचारी मनमानीपणे थकबाकीदारांची वीज कनेक्शन तोडत आहेत. मनमानी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी. तसेच थकबाकीची रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी. अनेक शेतकऱ्यांना चुकीचे मिटर रिडींग करून वाढीव वीजबिले पाठविण्यात आली आहे. तेव्हा अशा शेतकऱ्यांना वीजबिलात दुरूस्ती करून, त्यांना वीजबिल भरण्यास मुदतवाढ मिळावी. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे मीटर महापुरात बुडले आहे, त्यांचे मीटर महावितरणने स्वत:च्या खर्चाने बदलून द्यावे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे शेतीपंप व पाईपलाईन महापुरात वाहून गेले आहेत, त्यांचे पंचनामे तत्काळ करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी.अशा सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी तातडीने मार्गी काढावेत अशा मागण्या सामान्य नागरिक व शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी डॉ. अतुल भोसले, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक दयानंद पाटील, निवासराव थोरात, सयाजी यादव, धोंडीराम जाधव, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, मुकुंद चरेगावकर, प्रमोद पाटील, मोहनराव जाधव, धनाजी जाधव, उमेश शिंदे, आबासाहेब गावडे, चंद्रहास जाधव, भाजपचे तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, सचिन पाचूपते, गजेंद्र पाटील, बाळासाहेब घाडगे, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.






















