महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी फलटण: साखरवाडी गावातील सर्व सार्वजनिक गणपती मंडळांनी एकत्र येऊन ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवावी व कोरोना तसेच गणेशोत्सव आचारसहिता याचे काटेकोरपणे पालन करुन पोलीस प्रशासनास सहाय्य करावे असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी साखरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या पोलीस व सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांच्या झालेल्या बैठकीत केले.
यावेळी गणेश उत्सव आचारसंहिता तसेच कोरोना अनुषंगाने मिरवणुका होणार नाहीत. सॅनिटायझर व मास्कचा वापर करावा. या वर्षी विशेष करुन ‘एक गाव एक गणपती’ सकंल्पना राबवावी सदर संकल्पना राबवणाऱ्या गणेश उत्सव मंडळांना ट्रॉफी, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. सर्व गणेश मंडळानी धर्मादाय विभागाची परवानगी घ्यावी.
सार्वजनिक गणेश मंडळाचे गणेश मुर्तीची उंची जास्तीत जास्त ४ फुट असावी. मुर्ती शाडुची असावी. तसेच गणपती दान ही सकंल्पना प्रभावीपणे राबवावी. पोलीस प्रशासनाने दिलेल्या अटी व शर्ती नुसार धार्मिक वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन केले.