कराड : किरपे येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटेच्या सुमारास बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. वनविभागाने तात्काळ बिबट्याला ताब्यात घेवून सुरक्षित स्थळी हलवले आहे.
किरपे येथील शेतात बिबट्याने राज धनंजय देवकर या ५ वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला केला होता. यावेळी त्यांचे वडील धनंजय देवकर यांनी प्रसंगावधान दाखवत बिबट्याला प्रतिकार केल्याने ते बिबट्याच्या तावडीतून मुलाचा प्राण वाचवण्यात यशस्वी झाले. त्यानंतर वनविभागाने तात्काळ बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. बिबट्याने लहान मुलावर हल्ला केल्याच्या दोन दिवसानंतरच परिसरात ऊसतोड मजुरांना बिबट्याचे पुन्हा दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
किरपे येथील मौवटी नावाच्या शिवारात नारायण मंदिराजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी ग्रामस्थ विद्याधर देवकर, आनंदा देवकरयांनी, पोलीस पाटील प्रवीण तिकवडे यांना बोलावून बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असल्याचे दाखवले. त्यानंतर इतर ग्रामस्थांना याबाबतची कल्पना येण्याआधीच ग्रामस्थांचा उद्रेक टाळण्याच्या हेतूने वनविभागाने बिबट्याला अन्यत्र हलवले आहे.