पाटण प्रतिनिधी : कोविड ने शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात सुद्धा धमाकुळ घातला आहे. त्यामुळे वीट भट्टी कामगारा पासून ते शेत मजुरा पर्यंत सर्वांचे रोजगार गेले आहेत. गेल्या दोन वर्षापासून या कोरोना नावाच्या संकटाने सगळ्याच क्षेत्राचे नुकसान केले आहे. ग्रामीण भागात छोटे व्यावसायिक, दुकानदार मजूर वर्ग यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. हातावरचे पोट असणारे हे लोक यांची अवस्था फार दयनीय झाली आहे. त्यातच जीवनाश्यक वस्तुंच्या किमती मध्ये भरमसाठ वाढ झाल्याने जगणे मुश्कील झाले आहे. सध्या महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रत्यक्षात महागाई इतकी वाढली आहे कि सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्यात काही गोष्टी राहिल्याच नाहीत.
पेट्रोल-डीझेल च्या दराने शतक केव्हाच पार केले आहे. घरगुती गॅस मध्ये ही भरमसाठ वाढ झाली आहे. शेतीच्या मशागतीच्या दरासोबत रासायनिक खतांच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक यांना या महागाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच गोडेतेल याच्या दरवाढीमुळे गृहिणीना महागाईचा ठसका बसत आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य लोकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. मागील काही दिवसापासून गॅस च्या किमतीत सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. सद्या स्थितीत घरगुती गॅस हजारच्या घरात जावून पोचल्याने गॅस सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात परत चुली पेटायला सुरुवात झाली आहे. परंतु पावसाचे दिवस असल्याने सुके सरपण सुद्धा मिळत नसल्याने खेडोपाड्यातील लोक दुहेरी संकटात सापडले आहेत.
शासनाने ग्रामीण भागतील माता-भगिनीना चुलीतील होणाऱ्या धुरामुळे होणारा त्रास वाचवा त्यांचे आरोग्य चांगले राहावे व जंगलतोड याचा विचार करून प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेंतर्गत गावागावात गॅस देण्यात आले. त्यामळे असंख्य महिलांना चूल आणि धूर यापासून सुटका मिळाली होती. मात्र गेल्या काही दिवसापासून गॅस सिलेंडरचे दर अचानक वाढल्याने अनेक घरातील आर्थिक बजेट कोलमडले असून खेड्यातील गोरगरीब लोकांसाठी हे न परवडणारे असल्याने ग्रामीण भागातील गॅस सिलेंडर आता मोकळेच असल्याचे पाहायला मिळत आहेत.
ग्रामीण भागात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती त्यातच लॉकडाऊन मुळे अनेकांचा रोजगार बुडाला असल्याने हाताला काम नाही, मिळेल त्या मजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. त्यातच सिलेंडरचे भाव वाढल्याने एवढा पैसा आणायचा कोठून हा प्रश्न लोकांच्यापुढे पडला आहे. महागडे गॅस सिलेंडर परवडत नसल्याने महिलांना आता गॅस ऐवजी चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे. त्यामुळे गोरगरीब लोकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी गॅसच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी होताना दिसत आहे.