सुरगाणा : तालुक्यातील गुजरात सिमावर्ती भागातील उंबरठाण वनपरिक्षेत्रातील बर्डा, चिंचमाळ, उंबरपाडा, पिंपळसोंड, सोनगीर, पांगारणे, उदमाळ, रांजुने, दरापाडा, केळीपाडा, हडकाईचोंड, वडपाडा, चिंचले हा भाग गुजरातच्या राखीव जंगलास लागून असलेल्या भागात साग, खैर, हि झाडे आहेत. सागवानाची चोरटी लूट करून माती मोल भावात विकली जात आहे. या भागात आता सागवानाची झाडे जंगलात दुर्मिळ झाली आहेत.
दोन दिवसांपूर्वी बर्डा, चिंचमाळ, उंबरपाडा,पिंपळसोंड,सोनगीर या भागात खैर या मौल्यवान लाकडाची चोरटी लूट होत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. रात्रीच्या सुमारास उंबरपाडा पिंपळसोंड तिवसाची माळी येथून रस्त्यालगत असलेले एक खैराचे झाड चोरट्यांनी तोडून रातोरात लांबविले. तर दोन झाडे तोडून ठेवलेली आढळून आली आहेत. खैराची तस्करी करून सोनगीर या गावी खैराची लाकडे विकत घेणारा दलाल असल्याचे दबक्या आवाजात नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे. वनविभागाने त्याचा शोध घेऊन मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकांनी केली जात आहे. काही महिन्यांपूर्वीच गुजरात राज्यातील जहागीर या गावातील एका सागवान तस्कराला जेरबंद केले होते.
अशाच हा चोर शिपाईचा खेळ वनविभाग व लाकूड तस्कर यांच्या मध्ये अनेक वर्षांपासून पाठशिवणीचा जणू खेळच सुरु झाला आहे. मात्र वनविभागाला कायम स्वरुपी चोरांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळत नाही. गुप्त माहिती मिळताच उंबरठाण वनपरिक्षेत्रातील वनरक्षक हरी चव्हाण, तुषार भोये, अक्षय पाडवी, शेवंती गायकवाड, पुंडलिक राऊत वनमजूर कामडी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तोडलेल्या झाडांची पाहणी केली आहे. पुढील तपास वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी कसून चौकशी करत आहेत.