वडापाव म्हणजे जीव की प्राण. घड्याळाच्या कट्यावर धावणाऱ्या जगात एका ठिकाणी निवांत बसून खाण्यासाठी वेळ नसतो आणि आपल्याला परवडणारे. अशा वेळी त्यांची भूक भागवण्याचे काम वडापाव करतो. लुसलुशीत पावामध्ये गोड-तिखट चटणी घालून त्यात कुरकुरीत तळलेला गरमागरम वडा म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच.
सध्या चीज वडापाव, ग्रील वडापाव, शेजवान वडापाव असे वडापावचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. मात्र दुबईत चक्क 22 कॅरेट सोन्याचा अर्क लावलेला वडापाव मिळतोय. मसरत दौड यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत त्यांनी सोन्याचा वडापाव तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया दाखवली आहे. पारंपरिक वड्याध्ये बटर आणि चीजचा वापर करण्यात आला असून वडा बेसन लावून तेलामध्ये तळून घेतला आहे. शेवटी वड्यावर 22 कॅरेट सोन्याचा अर्क लावून छोट्याशा पेटाऱ्यात वडापाव ठेवला आहे. या पेटीत वडापावसोबत फ्रेंच फ्राईजही दिसत आहे. वडापावची किंमत दोन हजार रुपये आहे.