पाटण : भारतीय राज्य घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार हा अमुल्य अधिकार आहे, असे सांगून सशक्त लोकशाहीसाठी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाने मतदार नोंदणी करून सजगतेने निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन पाटण चे तहसीलदार रमेश पाटील यांनी केले.
बाळासाहेब देसाई कॉलेज,पाटण मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मतदार नाव नोंदणी अभियान उदबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तहसीलदार योगेश्वर टोंपे, बाळासाहेब देसाई कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. डी.पवार, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ.जी.एस.पट्टेबाहादूर, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सी.यू.माने उपस्थित होते.
रमेश पाटील म्हणाले, लोकशाहीवर असणारी निष्ठा दृढ करण्यासाठी राज्यघटनेने दिलेला मतदानाचा अधिकार पार पाडण्याची अमूल्य संधी मिळाली आहे. भारताची राज्यघटनेने दिलेला मतदानाचा हक्क प्रत्येकाने जागृततेने वापरला पाहिजे. मतदान न करणे म्हणजे लोकशाहीच्या मंदिरात निष्क्रिय राहिल्यासारखे ठरेल. कोणीही १८ वर्षावरील पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोग, प्रशासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे नमूद करून आपल्याबरोबर आपले कुटुंबिय, शेजारी, मित्र मतदान नाव नोंदणी व त्याच बरोबर त्यांना मतदान करण्यास प्रवृत्त करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्याचबरोबर नमुना ६ फॉर्म,नमुना ८ फॉर्म याविषयी माहिती सांगितली.
तहसीलदार योगेश्वर टोंपे म्हणाले, मतदान सजगतेने करणे हे मूलभूत राष्ट्रीय कर्तव्य असून लोकशाही प्रक्रियेतील सर्वच निवडणूकांसाठी १०० टक्के मतदान व्हावे. जास्तीत जास्त लोकांमध्ये मतदान प्रक्रियेविषयी जागृती करण्यासाठी मतदार नाव नोंदणी अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगून १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले. याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने कसा फॉर्म भरू शकतो याची माहिती सांगितली.
प्राचार्य डॉ. पवार यांनी आपल्या भाषणात मतदार म्हणून आपल्याला असलेल्या अधिकारांबाबत जागरूक राहिल्यास देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होऊ शकेल. तसेच नवमतदारामध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती व्हावी, यासाठी महाविद्यालय नेहमीच विविध उपक्रम राबवीत असते तसेच मतदान नाव नोंदणीसाठी जनजागृती करत असते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी अधिकारी डॉ. जी.एस.पट्टेबाहादूर यांनी केले. तर आभार प्रा. संदीप तडाखे यांनी मानले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा डॉ. हेमलता काटे यांनी सांभाळली.
कार्यक्रमाला तहसील ऑफिसचे कर्मचारी सचिन थोरात, प्रा.डॉ. एल.एस.भिंगारदेवे, प्रा. बळीराम लोहार, प्रा. श्रीगणेश गायकवाड यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.