पुणे : जेष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. आज सकाळी 9:15 वाजता पत्रकारानगरमधील त्याच्या राहत्या घरी वयाच्या 78व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय आणि मोठा मित्रपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारीच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने सामाजिक जाणीव असलेला आणि बालसाहित्यात मोठं योगदान देणारा साहित्यिक गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
मराठी साहित्यामध्ये त्यांनी त्यांच्या पुस्तकं, लेख यांद्वारे मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत त्यांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय, आणि मोठा मित्रपरिवार आहे. डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यासांमुक्तीच्या क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढेसुद्धा असाच पुढे चालू राहील असा दिलासा मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ही दुःखद बातमी सांगताना दिला आहे.
अल्प परिचय
पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे डॉ. अनिल अवचट यांचा जन्म झाला होता. त्यांनी बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस ची पदवी घेतली होती. महाविद्यालयीन जीवनापासूनच ते अनेक चळवळींमध्ये ते सहभागी झाले होते. ते स्वतः पत्रकार होते. मात्र पत्रकारितेतील व्यावसायिकतेला त्यांनी नेहमीच नकार दिला. त्यांच्या पत्रकारिता त्यांनी गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या प्रश्नानंसाठी केली. 1969 मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ हे प्रसिद्ध केले, तेव्हापासून सुरु झालेलया लेखणीतून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले. आतापर्यंत त्यांची 38 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गतवर्षीचा (2021) मसाप जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले होते.



























