
पांचगणी येथील महात्मा फुले विद्यामंदिर आणि श्रीमती कांताबेन जे. पी. महेता ज्युनिअर कॉलेजमध्ये दहावी आणि बारावीच्या शुभचिंतन व गुणगौरव समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य भोसले बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्राचार्य भोसले पुढे म्हणाले, गेल्या सुमारे दीड ते दोन वर्षापासून संपूर्ण जग हे कोरोना सारख्या महामारीला सामोरे जात आहे. यावेळी अनेक शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. यामुळे सर्वच शिक्षक- विद्यार्थ्यांची ताटातूट झाली होती. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नव्हता. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांशिवाय विद्यार्थ्यांनी मनापासून शिक्षणावर आपले लक्ष केंद्रित केले आणि यामध्ये सर्वांनीच भरभरून यश संपादन केले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे खरोखरच जेवढे कौतुक करू तेवढे कमीच आहे. विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या जिद्दीला, मेहनतीला मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीस मनापासून त्यांनी शुभेच्छा दिल्या.
शाळा सरस्वतीचे मंदिर आहे. या मंदिरात आम्ही राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा, समूहगीत, बालगीते शिकलो. प्रत्येक विषयाच्या शिक्षकांनी आमचा पाय पक्का केला. आज माझ्या नजरेसमोर अनेक प्रसंग तरळत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी वाटणारी भीती नाहीशी होऊन त्याजागी घट्ट नाते संबंध निर्माण झाले आहेत. या शाळेत मला अनेक मित्र मैत्रिणी मिळाल्या. अनेक खेळ आम्ही एकत्र खेळलो, एकत्र जेवण केले, एकत्र अभ्यास केला. सर्वधर्मसमभाव, राष्ट्रभक्ती, वृक्षप्रेम, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, मोठ्यांचा आदर, एकमेकास सहकार्य इत्यादी गोष्टी मी याच शाळेत शिकलो. स्नेहसंमेलन, सहली, विज्ञान प्रदर्शन, व्याख्यान, विविध स्पर्धा या दरम्यान अनेक अनुभव मिळाले. थोर नेत्यांच्या जयंती व पुण्यतिथी च्या प्रसंगी शिक्षकांनी सांगितलेले विचार आजही आमच्या मनात आहेत. प्रत्येक परीक्षेला वाटणारी धास्ती आमच्या शिक्षकांनी दूर केली. या शाळेत मी फक्त गणित शिकलो नाही तर आयुष्याचं गणित कसं सोडवाव हे देखील शिकलो. केवळ मराठी शिकलो नाही तर मराठी भाषेची परंपरा व मराठी वर प्रेम करायला शिकलो.काही वर्षांपूर्वी माझे या शाळेत आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो. शिल्पकार ज्या पद्धतीने ओबड धोबड दगडा पासून सुंदर शिल्प घडवतो, त्याचप्रमाणे येथील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडविले. या शाळेत आल्यापासून माझ्यावर येथील गुरुजनांनी उत्तम संस्कार केले. आभ्यासाबरोबर क्रीडा, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रात माझी आवड जोपासली. २१ व्या शतकात माणूस म्हणून कसे जगावे हे मला येथील शिक्षकांनी शिकवले, अशा भावना दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या मनोगतात व्यक्त केल्या.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर यांनी शाळा व ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील उजवल यशाचा आढावा घेतला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी गेले वर्षभर घेतलेल्या अथक परिश्रमाचे कौतुक करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर जीवनात यशस्वी होऊन देशाची सेवा करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य आर. के. भोसले यांचा प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
प्रा. भारती पवार यांनी प्रास्ताविक केले, पाचगणी येथील शालोम स्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद पवार यांनी मनोगत व्यक्त केले, प्रा. शैलजा पाटील यांनी आभार मानले तर प्रा. बी. बी. राजपूत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला वाल्मीकि विद्या मंदिर तळमावले चे शिक्षक प्रमोद जंगाणी,
सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.






















