फलटण : पोलीस पाटील हा शासनाचा प्रतिनिधी म्हणून गावपातळीवर कार्यरत असतो. गावाची कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची आहे.राज्यात सर्व विभागात एकूण १२४४२ पोलीस पाटलांची पद रिक्त आहेत. हि रिक्त पद भरावीत, पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ, शासनातर्फे विमा योजना सुरू करणे, निवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्षे करणे, निवृत्तीनंतर ठोस रक्कम अथवा पेन्शन मिळणे, अनुकंपा तत्व लागू करणे, कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये नुकसानभरपाई देणे व सरकारी सेवेत सामावून घेणे, अशा विविध मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत काही दिवसांपूर्वी एक बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव महसूल नितीन करीर, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, प्रधान सचिव गृह संजय सक्सेना, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि राज्यातील विविध पोलिस पाटील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत राज्यातील पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याबरोबरच पोलीस पाटलांचे मानधन वेळेत अदा करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले होते.त्याचीच अंमलबजावणी करत सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यात रिक्त असणाऱ्या पदावर पोलीस पाटील भरती प्रक्रिया होत आहे.त्याच अनुषंगाने फलटण तालुक्यातील ३५ गावात ही पदे रिक्त होती त्या पदांसाठी एकूण २१४ अर्ज प्राप्त झाले असून. या पदाच्या लेखी परीक्षेसाठी १९५ अर्ज पात्र ठरले आहेत.या परीक्षेचे हॉल तिकीट १० मार्चला मिळणार असून लेखी परीक्षा ही १३ मार्च रोजी मुधोजी हायस्कूल फलटण येथे सीसीटीव्ही कॅमेराच्या कक्षेत होणार आहे. आणि या परीक्षेचा निकाल हा तोंडी परीक्षेनंतर दिनांक १६ रोजी होणार आहे.






















