महाराष्ट्र न्यूज, सातारासातारा, दि. १३ मार्च : आजचा महाराष्ट्र पुरोगामी आणि सर्वच क्षेत्रात प्रगत म्हणून ओळखला जातो, याचे सारे श्रेय निर्विवादपणे यशवंतराव चव्हाण यांना जाते. सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श म्हणजे यशवंतराव चव्हाण होय, असे मत प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर यांनी व्यक्त केले. पांचगणी येथील महात्मा फुले विद्यामंदिर आणि श्रीमती कांताबेन जे. पी. महेता ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य वाळवेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य वाळवेकर आणि मान्यवरांच्या शुभहस्ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य वाळवेकर पुढे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि अंगी असलेल्या नेतृत्व गुणामुळे महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री देशाचे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी आपल्या कार्यकाळात अतिशय निष्ठेने आणि तळमळीने पार पाडल्या. आदर्श नितीमुल्य, स्वच्छ चारित्र्य असणाऱ्या यशवंतरावांचे कार्य आजच्या तरुण पिढीला निश्चितच दिशादर्शक आहे. सामाजिक कार्याची आवड आणि साधी राहणी, वाचनाची आवड ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक तरुणांमधील नेतृत्वगुण व धडाडी ओळखून त्यांना पुढे आणले. कृषी, शिक्षण, सहकार, सामाजिक, संस्कृतिक अशा विविध क्षेत्रांची जाण असलेले त्यांचे नेतृत्व होते.

देशाची संरक्षण मंत्री असताना त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात ठेवावे लागेल. त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असेही प्राचार्य वाळवेकर म्हणाले. याप्रसंगी कस्टोडियन भांगे सर, जाधव साहेब, अवघडे सर, प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





















