रेल्वे प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य द्या, लोणंद झोपडपट्टी वासियांचे योग्य पुनर्वसन करा, रेल्वे मार्गावरील उड्डाणपूलांची कामे तातडीने पूर्ण करा यासह अन्य मागण्या खा.श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत करून जिल्ह्यातील रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला. खा.श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे-मिरज-लोंढा या रेल्वे मार्गावरील प्रकल्पग्रस्त नागरिकांचे विविध प्रश्न मांडून त्यासंदर्भातील मागण्या रेल्वे मंत्रालयाच्या नियंत्रणातील अनुदानाच्या मागणी चर्चा सत्रादरम्यान केल्या. ते म्हणाले, या प्रकल्पासाठी जमिन संपादित करण्यात आली असून त्यामध्ये केवळ १० ते १५ गुंठे जमिन असणारे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांची सर्व जमिन या प्रकल्पात गेली आहे. २०२० साला पूर्वीपासून प्रकल्प सुरू झाला आहे, तेथील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे. असेही रेल्वेचे परिपत्रक आहे. त्या निर्णयाकडे लक्ष वेधून त्यानुसार जमिन अधिग्रहण केलेल्या सदर कुटुंबातील एका व्यक्तीला प्राधान्याने रेल्वेत नोकरी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. सातारा लोकसभा मतदारसंघातून १३५ किलोमीटर अंतराचा रेल्वे मार्ग जात आहे. यात मसूर, रहिमतपूर अशा ठिकाणी उड्डाणपुलांची कामे चालू आहेत. मात्र सदरचे काम अतिशय संथगतीने सुरू असून ते काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. तसेच वाठार, तारगांव व पाडेगाव येथे काम चालू आहे येथेही पुल होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर लोणंद नगरपालिका क्षेत्र आहे. तेथे जुने रेल्वे स्टेशन असून याठिकाणी सुमारे ५०-६० वर्षा पूर्वीपासून झोपडपट्टी वसली आहे. आता ती जागा खाली करण्याची नोटीस रेल्वे प्रशासनाने संबंधित झोपडपट्टी वासीयांना पाठवली आहे. इतके वर्षे तेथे वास्तव्य केल्यानंतर ती जागा सहजासहजी सोडून दुसरीकडे जाणे नागरिकांना शक्य होत नाही. तसेच त्यांच्या पुनर्वसनचा प्रश्नही आहे. त्यांच्या पुनर्वसनाकरिता जिल्हा प्रशासनाकडून ५ ते १० एकर जागा उपलब्ध करून दिल्यास त्यांचे योग्य पुनर्वसन करता येईल. तसेच तेथील झोपडपट्टी हटवण्याची तात्काळ कार्यवाही न करता याकरिता त्यांना आणखी अवधी द्यावा. तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी निधी देण्यात यावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली. पुणे व सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर निरेजवळ वॉटर पंपिग स्टेशन आहे, त्यापुढे नाही. त्यामुळे रेल्वे गाड्यांना पाण्याची आवश्यकता भासल्यास अडचण निर्माण होते. सातारा, कराड, रहिमतपूर याठिकाणी पाणी उपलब्ध असून जर त्याठिकाणी रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या तर पाण्याची गैरसोय दूर होईल आणि रेल्वे प्रवाशांसाठी पाण्याची चांगली सोय होईल.याशिवाय रेल्वे प्रकल्पासाठी केलेल्या भूसंपादनात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांना रेल्वे स्टेशनवर व्यवसायासाठी दुकान गाळे देण्यात यावेत. त्या गाळ्यात कृषि आधारित उत्पादने विकण्यास परवानगी दिल्यास त्यांच्या उपजीविकेचे साधन निर्माण होईल. कोल्हापूर-अहमदाबाद, कोल्हापूर-धनबाद, बेंगलोर-जैतापूर अशा रेल गाड्या कराड व लोणंद येथे थांबविण्यात याव्यात. म्हणजे देशाच्या दक्षिण व उत्तरेकडून येणा-या प्रवाशांना ते सोयीचे होईल असे यावेळी खा.श्रीनिवास पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.





















