छ. शाहू स्टेडियम, सातारा
महाराष्ट्र केसरीच्या गदेला ऐतिहासिक वारसा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (अनिल गायकवाड)
सातारा, दि. २८ मार्च : महाराष्ट्र केसरी पैलवानासाठीच्या चांदीच्या गदेला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. महाराष्ट्र केसरीला १९६१ साली सुरुवात झाली. तेव्हापासून चांदीची गदा दिली जाते. १९८२ सालापर्यंत ही गदा महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेच्या वतीनं देण्यात येत होती. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव माजी खासदार अशोक मोहोळ यांनी मामांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्यास गदा देण्याची परंपरा सुरू केली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा होताच, अशोक मोहोळ व चंद्रकांत मोहोळ गदा निर्मितीच्या कार्याला सुरुवात करतात.

स्पर्धेच्या ठिकाणी ते स्वत: गदा घेऊन जातात.
महाराष्ट्र केसरीसाठीच्या गदेची उंची साधारण २७ ते ३० इंच असून, व्यास ९ ते १० इंच इतका असतो. वजन ८ ते १० किलो असते. गदा संपूर्ण लाकडी असून, त्यावर चांदीचे नक्षीकाम केले जाते. २८ गेज चांदीचा पत्रा यासाठी वापरला जातो. या गदेवर कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांचे छायाचित्र असते मागील ३६ वर्षांपासून पंगांठी कुटुंबीय गदा बनविण्याचे काम करतात.




















