महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सातारा, दि. २८ मार्च : मराठी नववर्ष आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा (चैत्र शु. प्रतिपदा ) शनिवार दि. २ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त साखरेच्या गाठी आणि तयार लहान गुढीला बाजारपेठेत मागणी वाढली आहे. मुहूर्त साधण्यासाठी घराची खरेदी तसेच सोने, दागिने, वाहने व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी नोंदणी केली जात आहे.

शक १९४१ चैत्र शु. प्रतिपदेला (६ एप्रिल) भारतीय नूतन संवत्सर सुरू होत आहे. या दिवशी वैधृति योग असला, तरी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा दिवस शुभ आहे. या दिवशी नेहमीप्रमाणे गुढी उभी करून गुढीची पूजा केली जाते. तसेच पंचांगस्थ श्रीगणपतीचे पूजन केले जाते..या संवत्सराचे नाव विकारी असे आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी परंपरेप्रमाणे सकाळी सूर्योदयानंतर गुढी (ब्रह्मध्वज) उभी करून तिची पूजा केली जाते. पंचांगाची पूजा करून सायंकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी परत उतरवून ठेवली जाते. गुढीपाडवा हा नवीन संकल्प करण्याचा दिवस देखील आहे.
दरम्यान गुढीपाडव्यानिमित्त साखरेच्या गाठी बनविण्याची लगबग सुरु झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. सातारा बाजारपेठेतील भरतशेठ राऊत यांच्या राऊत मिठाईच्या दुकानात साखरेच्या गाठी बनविण्याची कामाला गती आली असून हजारो साखरेच्या गाठी बनविण्याच्या कामात कामगारवर्ग मग्न असल्याचे दिसून येत आहे. साखरेच्या गाठींच्या किंमती १० रुपयापासून ११११ रुपयापर्यंत असल्याची माहिती भरतशेठ राऊत यांनी दैनिक महाराष्ट्र न्यूज च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
– राऊत मिठाईच्या दुकानात साखरेच्या गाठी बनविण्याच्या कामात कामगारवर्ग मग्न असल्याचे चित्र.































