महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी:
पुणे :आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी भारतीय हवामान शास्त्र विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ, तांत्रिक अधिकारी तसेच मुंबईतील एका खासगी कंपनीच्या संचालकावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) गुन्हा दाखल केला. वेधशाळेने बसवलेल्या डिजिटल फलक खरेदीत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवला होता.
याप्रकरणी भारतीय हवामान शास्त्र विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गुरफान बेग, तत्कालिन तांत्रिक अधिकारी विपीन माळी तसेच मुंबईतील व्हिडिओ वॉल इंडिया प्रा.लि.चे संचालक अनिल गिरकर, मनीषा गिरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
हवेची गुणवत्ता तसेच हवामानाचा अंदाज वर्तविणारे फलक शहरातील बारा ठिकाणी बसविण्याचे काम मुंबईतील व्हिडीओ वॉल इंडिया प्रा.लि. देण्यात आले होते. “सफर’ (सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च) या योजनेअंतर्गत डिजिटल फलक बसविण्यात आले होते. हे फलक बसविणे तसेच कंत्राट प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (सीबीआय-एसीबी) करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती.