छताची दुरूस्ती करताना सुरक्षा उपाययोजनासाठी कारखानदारांना सूचना
पिंपोडे बुद्रुक -प्रतिनिधी-तेजस लेंभे
पावसाळ्यापूर्वी अनेक कारखान्यांच्या छताच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. हे करताना अनेकदा गंभीर अपघात होतात. हे प्रकार टाळण्यासाठी कामगारांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना कारखानदारांना औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाने दिल्या असून त्याचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन सातारा औद्योगीक सुर व आरोग्य विभागाचे सहसंचालक अभिजीत अवसरे यांनी केले आहे.

कारखान्यांच्या छताच्या दुरुस्तीदरम्यान छतावरून पडून कामगारांचे मृत्यू आणि जखमी होण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. त्यामुळे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या सहसंचालकांनी कारखानदारांना सुरक्षेविषयी सूचना तसेच काही नियम घालून दिले.आहेत. संबंधित काम करणारी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्षम असावी. तसेच त्यांसदर्भाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. उंचीवर काम करणाऱ्या व्यक्तीने परमिट टू वर्कचा वापर करावा. कामगारांना सुरक्षा शिरस्त्राण तसेच इतर सुरक्षा साधने उपलब्ध करावी. तसेच कामाच्या निरीक्षणाकरता अनुभवी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील संपूर्ण मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहे. कारखानदारांनी सूचनांचे पालन करावे असे आवाहन सातारा औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक अभिजित अवसरे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील औद्योगिक क्षेञात विलक्षण वाढ होत असून वाढत्या औद्योगिकीकरणासोबत कारखानदारांनी कामगारांच्या सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देण्याची गरज आहे. त्यासाठी विभागाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. कामगारांनी देखील आपल्या स्वत:च्या शरीराची काळजी घेत कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची गरज आहे.
अभिजित अवसरेसहसंचालक,औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचनालय.





















