महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसातारा, दि. ७ एप्रिल : माण पंचायत समितीमधील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (नरेगा) विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेल्या आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून आणि या योजनेतील गैरकारभाराची चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मार्डी (ता. माण) येथील शिवाजी दशरथ पोळ यांनी माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि. २५ एप्रिल रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मार्डी (ता. माण) येथील शिवाजी दशरथ पोळ यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (नरेगा) अंतर्गत नाडेप आणि व्हर्मी कंपोस्ट या कामांचा लाभ घेण्यासाठी माण पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने दि. ५ मार्च, २०२० रोजी माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेकडून कार्यारंभ आदेश मिळाला होता. सदर यांनी नाडेप आणि व्हर्मी कंपोस्ट ही दोन्ही कामे पूर्ण केलेली आहेत. सदर दोन्ही कामांचे मूल्यमापन झाले असून सदरची दोन्ही कामे ही दि. ३० एप्रिल, २०२० रोजी पूर्ण होऊन मूल्यांकनही झालेले आहे. परंतु सदर कामाचे कोणतेही बिल पोळ यांना आजअखेर मिळालेले नाही. सदर कामाच्या अनुषंगाने नरेगा विभागामध्ये पोळ यांनी गेले दीड वर्ष वारंवार हेलपाटे मारूनही त्यांना नरेगा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन प्रत्येक वेळी त्यांचे बिल काढून देण्यासाठी पैशांची मागणी केली जात होती. पोळ यांनी सदर कामासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांचा सदर कामाचा प्रस्ताव गहाळ झाल्याचे नरेगा योजनेतील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून सांगितले जात असून सदर योजनेचे बिल देण्यास नकार दिला जात आहे. तसेच व्हर्मी कंपोस्ट या प्रस्तावात पोळ यांनी सर्व कागदपत्रे बरोबर जोडून सादर केली होती. त्याचे मूल्यांकनही झाले असून सदर प्रस्तावची कागदपत्रे नरेगा विभागाने उलट-सुलट जोडून कागदपत्रे चुकीची आहेत, असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत आणि गेले दीड वर्ष या कामाच्या बिला पासून वंचित ठेवलेले आहे. नरेगा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी नाहक आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास दिलेला असल्यामुळे पोळ यांनी माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना समक्ष भेटले असता पोळ यांना त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात देणे त्यांनी सुचवले. माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार पोळ यांनी त्यांच्याकडे त्यांचे लेखी म्हणणे सादर केले असून नरेगा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्याकडे केलेली आहे. शिवाजी पोळ यांनी माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंचायत समितीतील नरेगा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी माझ्यावर अन्याय व अत्याचार केला असून याबाबत मला न्याय न मिळाल्यास मी माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि. २५ एप्रिल २०२२ रोजी आत्मदहन करणार आहे. यावेळी माझे काही बरेवाईट झाल्यास त्याला प्रशासन आणि माण पंचायत समिती कार्यालय जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी, असा इशाराही कोळी यांनी दिला आहे.































