महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : प्रतापसिंह भोसले(फलटण शहर )
आगामी पाच वर्षासाठी केंद्र सरकारने इथेनॉलचे चांगले धोरण जाहीर केलेले आहे , त्यामुळे आगामी काळात इथेनॉलचा साखर कारखानदारीला मोठा आधार मिळणार आहे . इथेनॉलचे केंद्र सरकारने २५ वर्षासाठी धोरण जाहीर करावे , अशी मागणी केंद्रीय मंत्री गटाचे अध्यक्ष अमित शाह यांचेकडे करण्यात आली आहे , अशी माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली .
इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या १२ हजार मे.टन क्षमतेच्या मोलॅसेस टॅंकचे भूमिपूजन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरचे सभापती अप्पासाहेब जगदाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
याप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी देशातील साखर उद्योगाचा आढावा घेतला.ते पुढे म्हणाले , पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे धोरण राबविण्यास केंद्र सरकार सकारात्मक आहे . नीरा-भीमा कारखान्याच्या आसवानी प्रकल्पातून आगामी गळीत हंगामापासून प्रतिदिनी ६० हजार लिटर इथेनॉलचे उत्पादन होणार आहे . कारखाना आगामी गळीत हंगामात ७ लाख मे.टन उसाचे गाळप पुर्ण करणार आहे . नवीन १२ हजार मे.टन क्षमतेच्या मोलॅसेस टॅंकच्या उभारणीमुळे मोलॅसेस साठवणूकीची अडचण आता राहणार नाही .
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले , सध्या साखर कारखानदारी आर्थिक अडचणीत आहे . त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर क्विंटलला किमान रू. ३५०० ते ३६०० करावा , बेल आऊट पॅकेजच्या माध्यमातून दोन वर्षे गाळप झालेल्या ऊसास प्रति टन रू. ६५० प्रमाणे सुमारे २० हजार कोटी रुपयांचे अनुदान द्यावे , अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री गटाचे अध्यक्ष अमित शाह यांचेकडे केली आहे .
या कार्यक्रमात इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे , कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांची भाषणे झाली . यावेळी संचालक विलासराव वाघमोडे , उदयसिंह पाटील , राजवर्धन पाटील , कृष्णाजी यादव , दत्तात्रय शिर्के , प्रतापराव पाटील , दादासो घोगरे , संजय बोडके , प्रकाश मोहिते , दत्तू सवासे , हरिदास घोगरे , मच्छिंद्र वीर , बबनराव देवकर , भागवत गोरे , चंद्रकांत भोसले , संगिता पोळ , जबीन जामदार , कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील उपस्थित होते . आभार कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी मानले .