श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर.
फलटण
गेल्या दोन वर्षातील कोरोनाच्या प्रादुर्भावा नंतर यंदा प्रथमच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायी वारीसाठी मंगळवार दि . २१ जून रोजी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. यंदा पालखी सोहळ्यात तिथीची वृध्दी झाल्याने लोणंद मध्ये अडीच दिवस तर फलटण मध्ये दोन दिवस पालखी सोहळा मुक्कामी राहील . दिंडीक-यांच्या मागणी नुसार यंदापासून संस्थानच्या सही शिक्क्याने वाहन पास दिले जातील अशी माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे पाटील यांनी दिली आहे.
श्री क्षेत्र पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा नियोजनाची बैठक पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . या बैठकीस श्रीमंत उर्जितसिंह शितोळे , प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई , विश्वस्थ डॉ अभय टिळक , ह भ प नामदेव महाराज वासकर , राणू महाराज वासकर , श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ माऊली जळगावकर , दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊ महाराज गोसावी , सचिव मारुती कोकाटे , बाळासाहेब रंदवे , भागवत चवरे , भाऊ फुरसुंगीकर , सोपानकाका टेंबुकर , गुरुजीबुवा राशिनकर , शरद गायकवाड , बाळासाहेब उकळीकर , एकनाथ हांडे , दिनकर वांजळे , राजाभाऊ थोरात , बाळासाहेब वांजळे , व्यवस्थापक माऊली वीर , सह व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांच्यासह दिंडी प्रमुख व फडकरी उपस्थित होते .
आषाढी पायी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम
मंगळवार दि . २१ जून रोजी सायंकाळी ४ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान ठेवेल . बुधवार दि २२ व गुरुवार दि २३ रोजी पुणे , शुक्रवार दिं २४ व शनिवार दि . २५ रोजी सासवड , रविवार दि . २६ रोजी जेजुरी , सोमवार दि . २७ रोजी वाल्हे , मंगळवार दि . २८ व बुधवार दि . २९ रोजी लोणंद , गुरुवार दि . ३० रोजी तरडगांव , शुक्रवार दि . १ व शनिवार दि . २ जुलै रोजी फलटण , रविवार दि . ३ रोजी बरड , सोमवार दि . ४ रोजी नातेपुते , मंगळवार दि . ५ रोजी माळशिरस , बुधवार दि . ६ रोजी वेळापूर , गुरुवार दि . ७ रोजी भंडीशेगाव , शुक्रवार दि . ८ रोजी वाखरी तर शनिवार दि . ९ रोजी श्री क्षेत्र पंढरपुर मुक्कामी सोहळा पोहोचेल . रविवार दि . १० जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे . पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब , बाजीराव विहीर व इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे ( सदशिवनगर ) , पानीव पाटी , ठाकुरबुवा व बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे .
दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊ महाराज गोसावी म्हणाले , पालखी सोहळ्यातील अवांतर गर्दी कमी करण्यासाठी ज्यांच्याकडे पास नाही अशी वाहने वारीत सोडू नयेत . याबाबत पोलिसांना माहिती द्यावी . वाहनांना पास देताना पुर्वी दिंडीक-यांची अडवणूक होत होती . ती अडवणूक थांबवण्यासाठी वाहनांचे पास हे संस्थानच्या सहीने द्यावेत अशी मागणी त्यांनी केली . त्यास सर्व दिंडी प्रमुखांनी टाळ्यांच्या गजरात पाठींबा दिला .
दिंडी सोहळ्याचे सचिव मारुती कोकाटे म्हणाले , संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम सोहळ्यापुर्वी पूर्ण व्हावे . सासवड येथील पुलाच्या कामासाठी ६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत . परंतु हे काम अद्याप सुरु नाही . जेजूरीला नवीन तळासाठी ९ एकर जागा शासनाने उपलब्ध करुन दिली आहे . तीचा ताबा मिळावा . पालखी सोहळ्यापुर्वी पालखी तळ सुसज्ज व्हावेत .
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथापुढे २७ तर रथामागे २५१ दिंड्या नोंदणीकृत आहेत . तसेच नोंदणी नसलेल्या १२५ ते १५० दिंड्या आहेत . सोहळ्यातील या दिंड्यांना वाहन पास दिले जातील . वाहन पासाचा गैरवापर टाळण्यासाठी नोंदणीकृत दिंडी चालकाने १५ मे पर्यंत वाहनांचे नंबर , वाहन चालकाचे नांव व मोबाईल नंबर संस्थानकडे द्यावेत . यंदा माऊली सोबत सुमारे पाच लाख समाज राहिल . त्यादृष्टीने पालखी तळ , आरोग्य , पाणी , वीज , रस्ता व सुरक्षा याबाबत शासनाकडे योग्य तो पाठपुरावा केला जाईल असे सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे पाटील यांनी सांगितले आहे.