पाटण ( प्रतिनिधी ) पाटण तालुक्यात सोमवारी आणखी चार व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यापुर्वी कोरोनामुक्त झालेले परंतु त्यांचेकडे होम क्वारंटाइनची सुविधा नसल्याने पाटण येथील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल अन्य चार जणांनाही घरी सोडण्यात आले आहे. आता 25 बाधीत रूग्नांवर कृष्णा हाॅस्पीटल कराड येथे उपचार सुरू असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. आर. बी. पाटील यांनी दिली. पाटण तालुक्यात आत्तापर्यंत एकूण 63 व्यक्तींना कोरोनाची लागन झाली. यापैकी दोन महिलांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत यापैकी तब्बल 36 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे यापैकी अपवाद वगळता सर्वांनाच घरी सोडण्यात आले असून त्या ठिकाणी त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. सोमवारी कृष्णा हाॅस्पीटल कराड येथून कोरोनावर मात केलेल्या सदूवरपेवाडी, गलमेवाडी, करपेवाडी, ताम्हीणे येथील प्रत्येकी एक अशा एकूण चार व्यक्तींना घरी सोडण्यात आले. या अगोदर कोरोनामुक्त झालेल्या परंतु त्यांच्याकडे होम क्वारंटाइनची सुविधा नाही अशांना कराड येथून सोडल्यानंतर पाटण कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते त्यापैकी सोमवारी जांभेकरवाडी दोन, नवारस्ता व घाणबी येथील प्रत्येकी एक अशा एकूण चार व्यक्तींनाही घरी सोडण्यात आले आहे. आता बाधीतांच्या संपर्कातील हाय रिस्कमधील प्रियदर्शनी महिला वसतीगृहपाटण येथे 7 व कोरोना केअर सेंटर पाटण येथे 3 अशा एकूण 10 व्यक्तींना येथे इन्स्टीट्युशल क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान सध्या नव्याने कोणाचेही स्वॅब घेण्यात आले नाहीत अथवा कोणाचे अहवालही प्रलंबित नाहीत. उर्वरित इन्स्टीट्युशल क्वारंटाइन करण्यात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब नमुने मंगळवारी तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे डाॅ. आर. बी. पाटील यांनी सांगितले.