आदरणीय स्व. पी.डी. पाटील यांच्या जयंतीदिनी प्रतिष्ठानच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : येथील आदरणीय पी.डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने, दि. १ जुलै रोजी आदरणीय स्व. पी. डी. पाटील यांची १०४ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे.
प्रतिष्ठानच्यावतीने मंगळवार पेठ येथील निवासस्थानी, सकाळी ९ वाजता स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी, प्रतिष्ठानचे विश्वस्त व संयोजन समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत. तद्नंतर सर्व विश्वस्त आदरणीय स्व. यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या ‘समाधीस्थळी’ पुष्प अर्पण करण्यासाठी जाणार आहेत.
प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा ‘आदरणीय पी.डी.पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर गेली २ वर्षे स्थगित करण्यात आला होता. आता, २०२२ च्या पुरस्कारांची घोषणा पत्रकार परिषदेत १ जुलै रोजी दुपारी ४ वाजता प्रतिष्ठानचे कार्यालय ‘अनंत कॉम्प्लेक्स’ मंगळवार पेठ, याठिकाणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणनमंत्री मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील हे करणार असून, यावेळी उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर व सर्व विश्वस्तांची उपस्थिती असणार आहे.

अशी माहिती प्रतिष्ठानच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. आदरणीय स्व. पी. डी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त ‘अभिवादन’ करण्यासाठी, साहेबप्रेमींनी सकाळी ९ वाजता उपस्थित रहावे,असे आवाहनही प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.






















