सातारा : सातार्यातील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक प्रकाश खटावकर याने हम करे सो कायदा या नीतीनुसार परिवहन कार्यालयात उच्छाद मांडलेला आहे. काही अडेलतट्टू एजंटांना हाताशी धरुन त्याने गेल्या काही वर्षांमध्ये कोट्यवधींची माया कमविलेली आहे. त्याच्या बेशिस्त वर्तनामुळे या कार्यालयात येणार्या अनेकांना मनस्तापासह आर्थिक फटका बसत असल्यामुळे आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर यांनी जिल्हाधिकार्यांना याबाबत निवेदन दिले असून खटावकर याच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करुन त्याच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी याद्वारे केली आहे. येत्या आठ दिवसांत त्याच्यावर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशाराही भोगांवकर यांनी दिलेला आहे.याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक प्रकाश खटावकर हे मनमानी कारभार करीत असून स्वत:चा आर्थिक लाभ होईल आणि शासनाचे नुकसान होईल, अशा पद्धतीने हम करे सो कायदा यानुसार कामकाज करीत आहेत. या संदर्भात खटावकर यांच्या विरोधात यापूर्वी अनेक तक्रारीसुद्धा त्यांच्या वरिष्ठांकडे झालेल्या आहेत. मात्र वरिष्ठांनाही खटावकर जुमानत नाहीत. राज्या बाहेरील वाहने तपासणी करीत असताना त्यासंदर्भात पारित करण्यात आलेले कोणतेही नियम ते पाळत नाहीत. कार्यालयीन आदेश नसताना स्वत:च स्वत:च्या अधिकारात ते आर्थिक तडजोडीसाठी वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करीत नाहीत. जर वाहन तपासणीचा अधिकार किंवा वरिष्ठांचा आदेश नसेल तर खटावकर कोणत्या अधिकारात वाहनांची फिटनेस तपासणी करीत आहेत, हे समजून येत नाही.उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काही एजंटांना हाताशी धरुन मोटर वाहन निरीक्षक प्रकाश खटावकर यांनी अनेक बेकायदेशीर कामे आपल्या पदाचा दुरुपयोग करुन केलेली आहेत. त्यामुळे त्यांची खातेनिहाय चौकशी करुन त्यांना दिलेल्या अधिकारांची योग्यरित्या अंमलबजावणी न करणे, कार्यालयीन शिस्त न पाळणे, शासनाचे नुकसान होईल, अशी कृती करणे, आदेश नसताना परस्पर वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र देवून स्वत:च्या आर्थिक लाभासाठी नेमून दिलेले कार्यालयीन कामकाज न करणे, वरिष्ठांना विविध माध्यमांतून दमबाजी करुन त्यांच्यावर राजकीय दबाव आणून स्वत:चे आर्थिक हित जपणे आदी बेकायदेशीर कामे ते आपल्या पदाचा गैरवापर करुन ते करीत आहेत. त्यामुळे आपणांस विनंती आहे की, मोटर वाहन निरीक्षक खटावकर यांच्यावर शिस्तभंग तसेच त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन कमविलेल्या मिळकतीची चौकशी करुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. येत्या आठ दिवसांत कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांसह आंदोलाचा इशाराही या निवेदनाद्वारे भोगांवकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे.जिल्हाधिकार्यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव, जिल्हा संघटक महेंद्र बाचल, जिल्हा प्रवक्ते निवृत्ती शिंदे, शहराध्यक्ष जयराज मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.